बेळगाव लाईव्ह :महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात नरेगा योजनेअंतर्गत नियमानुसार काम आणि पगार दिला जात नसल्याच्या निषेधार्थ सदर योजनेअंतर्गत काम करणाऱ्या बेळगाव तालुक्यातील नरेगा कामगारांनी आंदोलन छेडून जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अर्थात नरेगा योजनेअंतर्गत नियमानुसार काम आणि पगार दिला जात नसल्यामुळे नाराज झालेल्या बेळगाव तालुक्यातील महिला नरेगा कामगारांनी आज सोमवारी सकाळी जिल्हा पंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी (सीईओ) अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
सीईओंच्या गैरहजेरीत जिल्हा पंचायत योजना अधिकारी गंगाधर दिवटर यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याच्या श्वासन दिले. याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी नरेगा महिला कामगार नेत्या बोलताना पद्मा शंकर बसरीकट्टी यांनी म्हणाल्या की, नरेगा योजनेअंतर्गत प्रत्येक गावातील गरजू लोकांना योजनेत समाविष्ट करून हा नियम आहे. मात्र या नियमाचे पालन न करता संबंधित अधिकाऱ्यांकडून तुम्हाला 20 तारखे नंतर रोजगार उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन नरेगा महिला कामगारांना दिली जात आहेत.
संबंधित कामगार हे रोज राबवून खाणारे असल्यामुळे ही मागणी आम्हाला मान्य नाही. मागील वेळीही तुम्हाला 100 दिवस काम देतो असे सांगून 80 दिवसांचे काम देण्यात आले होते. या पद्धतीने गोरगरीब तळागाळातील लोकांच्या उत्कर्षासाठी सुरू केलेल्या या योजनेचा लाभ संबंधित अधिकारी लाभार्थींना मिळूच देत नाहीत. शिवाय कामगार संपूर्ण पगारही दिला जात नाही प्रतिदिन 340 रुपये पगार ठरलेला असताना कामगारांना 320-30 रुपये पगार दिला जातो.
या पद्धतीने सरकारी योजनांसाठी काबाडकष्ट करून देखील नरेगा कामगारांना त्यांच्या कष्टाचा मोबदला दिला जात नसल्यामुळे आज आम्ही हे आंदोलन केले आहे. संबंधित पीडिओ तुम्हाला जर रोजगार हवा असेल तर तो रोजगार उपलब्ध करून देणारे काम तुम्हीच शोधून काढा आणि आम्हाला सांगा, असे व बेजबाबदार उत्तर देतात.
या पद्धतीने आमच्याकडून भूतरामनहट्टी, कणबर्गी वगैरे ठिकाणची कामे करून घेण्यात आली आहेत याची चौकशी केली जावी तसेच नरेगा योजनेतील महिला कामगारांना 100 दिवसाचे काम आणि त्या कामाचा योग्य मोबदला दिला जावा अशी आमची मागणी असल्याचे पद्मा बसरीकट्टी यांनी स्पष्ट केले.