महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हिंडलग्यात उभारण्यात येणाऱ्या स्मृतिभवनाच्या भूमिपूजनानंतर कन्नड संघटनांचा तिळपापड होत असून कन्नड संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. ३१ मार्च रोजी या स्मृतिभवनाचं भूमिपूजन करण्यात आलं असून, यासाठी खासगी व्यक्तीने दिलेल्या जमिनीवर उभारणी होणार आहे.
मात्र या जमिनीला आवश्यक असलेली येणे परवानगी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकल्पाला परवानगी देऊ नये, अशी जोरदार मागणी कित्तूर कर्नाटक सेनेतर्फे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात १९४८ साली सीमालढ्याच्या काळात झालेल्या हिंसाचारात मृत पावलेल्या लोकांना “हुतात्मे” म्हणून गौरवले जात आहे. या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या स्मृतिभवनात कर्नाटक सरकारविरोधी आणि पोलिसांविरोधात भावना भडकावणारे फोटो आणि चित्रफिती दाखवण्यात येणार असल्याचे सांगत या स्मृतिभवनाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
कन्नड संघटनांचा हा विरोध म्हणजे मराठी जनतेच्या ऐतिहासिक संघर्ष आणि हक्कांना दाबण्याचा प्रयत्न आहे. स्मृतिभवन हे कोणत्याही एका समुदायाविरोधात नसून, सीमालढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात येत आहे.
या स्मारकाच्या माध्यमातून सीमालढ्याचं महत्त्व आणि मराठी जनतेच्या बलिदानाची आठवण कायम राहावी, ही यामागची भूमिका आहे. मात्र भूमिपूजन पार पडल्यानंतर कन्नड संघटनांनी थयथयाट करण्यास सुरुवात केल्याने प्रशासनाचीही यावर वक्रदृष्टी असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.