बेळगाव लाईव्ह : छत्रपती संभाजी महाराजांनी हयातीत 114 लढाया केल्या. मात्र एका लढाईत त्यांचा पराभव झाला. चिक्कमंगळूर येथे चिक्कदेवरायाने संभाजी महाराजांचा पराभव केला. पराभव झाल्यावर ते माघारी न फिरत तामिळनाडूत गेले. कावेरी नदीलगत जंगलात त्यांनी बाणाच्या टोकाला पलिते लावून तेथील एक किल्ला जिंकला. संभाजी महाराज हे विद्वान, कवी व दृष्टे होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित सहाव्या अ. भा. बेळगाव मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
तीस वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा कोणत्या कार्यक्रमात दिसत नव्हती. छावा चित्रपटानंतर छत्रपती संभाजी महाराजांविषयी नवविचार सुरू झाला आहे. 1685 मध्ये मुंबई गव्हर्नरकडे होती. त्यावेळी संभाजी महाराजांनी मुंबई विकत घेण्याचा करार केला होता. पण हा करार यशस्वी झाला नाही. जंजिरा किल्ल्यावर शिवरायांनी पाच वेळा आक्रमण केले. पण यश आले नाही. संभाजी महाराजांनी समुद्रात पाषाण ठेवून सेतू बांधला. छावा चित्रपटात दाखवलेली बुर्हाणपूरची लढाई झाली नव्हती. ती लूट होती, असे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांविषयी औरंगजेबाने इतका धसका घेतला होता की दरबार भरवून त्याने राजमुकुट जमिनीवर फेकून त्यांना मारण्याची शपथ घेतली होती.
भाषा ही शब्दांची नसून माणुसकीची गंगा आहे. ती प्रवाहित ठेवणे आवश्यक आहे. मराठी कार्यक्रम जिथे असतो, तिथे उपस्थिती असणे आवश्यक आहे, असे आवाहन उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी उद्घाटनपर भाषणात केले.
मराठा मंदिराचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. अभामसा परिषदेचे उपाध्यक्ष डी. बी.पाटील यांनी स्वागत केले.
जिल्हाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक भाषणात बोलताना बेळगाव परिसरात मराठी भाषा व संस्कृती जतन करण्यासाठी पंधराहून अधिक साहित्य संमेलने होतात, असे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, डॉ. शरद गोरे, संजय मोरे, अरूणा गोजे पाटील, रणजीत चौगुले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मोहन पाटील व डॉ. संजीवनी खंडागळे यांनी केले.
दुसऱ्या सत्रात साहित्यानंद या विषयावर अहिल्यानगरचे साहित्यिक डॉ संजय कळमकर यांचे व्याख्यान झाले तर तिसऱ्या सत्रात लोकसंस्कृती कला संस्था खानापूर प्रस्तुत शाहीर अभिजीत कालेकर आणि सह कलाकारांनी लोककलेतून मनोरंजन आणि जागर केला. उद्योजक युवराज हुलजी, महादेव चौगुले, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, शिवाजी अतिवाडकर, बाळाराम पाटील, मिस्टर इंडिया सुनील आपटेकर ,नागेश मुचंडी बाळासाहेब काकतकर आदी उपस्थित होते. संमेलनास मराठा मंदिराचे सभागृह भरले होते.