बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील वाढत्या पाणी समस्येवरून महापालिकेत आज जोरदार चर्चा झाली असून नगरसेवकांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
आज महानगरपालिकेत बोलाविण्यात आलेल्या बैठकीत दूषित पाणीपुरवठा, गळती, रखडलेली पाईपलाइन दुरुस्ती आणि खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समस्या चर्चेत आल्या. शहरातील पाण्याच्या नियोजनाचा उडालेला बोजवारा लक्षात घेत जर १५ दिवसांत उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महापौर मंगेश पवार यांनी दिला.
शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. महापालिकेत झालेल्या विशेष बैठकीत नगरसेवकांनी एल अँड टी कंपनीच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवाय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अनेक वॉर्डांमध्ये लिकेजमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे, तर काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील १३५ पाणी टँकर असूनही नागरिकांना पुरेसं आणि शुद्ध पाणी मिळत नाही. पाईपलाइनची दुरुस्ती वेळेवर होत नाही. काही भागांमध्ये नवीन पाइपलाइन टाकण्यात आली असली, तरी त्यानंतरही तिथं पाणीच येत नाही. विशेषतः १३ आणि १४ नंबर वॉर्डमध्ये ड्रेनेज मिश्रित पाणीपुरवठा होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
नागरिक वेळेवर पाण्याचे बिल भरतात, पण त्यांना योग्य सेवा मिळत नाही. एका लहानशा गळतीची दुरुस्ती करण्यासाठी आठ-आठ दिवस लागत आहेत. हे प्रशासनाचं अपयशच असल्याचं नगरसेवकांनी ठणकावून सांगितलं. विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात या भागातील पाईपलाइन विधानसौधला पुरवठा करण्यासाठी वळवली जाते, त्यामुळे दोन महिने येथील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त होतात अशा अनेक समस्यां सभागृहात उपस्थित नगरसेवकांनी मांडल्या.
नागरिकांना दाखवलेलं २४ तास पाणीपुरवठ्याचं स्वप्न केवळ आश्वासन राहणार का, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला.नगरसेवकांनी एल अँड टी कंपनीच्या कार्यपद्धतीवरही जोरदार टीका केली. अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत, परंतु पुनर्बांधणीसाठी कोणतीही तत्परता दाखवली जात नाही. काही भागांमध्ये टँकरसुद्धा उशिरा पाठवले जात असल्याची तक्रार करण्यात आली.
यावर प्रतिक्रिया देताना महापौर मंगेश पवार यांनी, ठिकठिकाणी झालेल्या गळतीची ठिकाणे शोधून त्वरित गळती शोधून बंद करा आणि पाण्याचा अपव्यय थांबवा, अशा सूचना दिल्या. तसेच अधिकाऱ्यांना महापौरांनी पाण्याच्या नियोजनासंदर्भात कडक सूचना दिल्या असून, तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.
या बैठकीला महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी विलास जोशी, मनपा आयुक्त शुभा बी., नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.