बेळगाव लाईव्ह :पाण्याच्या वादातून एकाला फावड्याने व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या आरोपातून सोनोली येथील तिघा जणांची बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने साक्षीदारातील विसंगतीमुळे निर्दोष मुक्तता केली आहे.
मारुती नारायण चांदिलकर (वय 50 वर्षे, धंदा -शेती), अनिकेत मारुती चांदीलकर (वय 23, धंदा -शेती) आणि मनोज मारुती चांदीलकर (वय 21, धंदा -शेती, सर्व रा. हनुमान गल्ली, सोनोली ता. जि. बेळगाव) अशी निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींची नांवे आहेत.
या तिघांवर भैरू नारायण चांदीलकर यांना मारहाण केल्याचा आरोप होता. हे सर्वजण एकाच भावकीतील असून त्यांच्यामध्ये गेल्या 5 वर्षांपासून शेती घर व शेतातील विहिरीच्या पाण्यावरून वाद सुरू आहे. त्यामुळे गावातील पंचांनी विहिरीचे पाणी प्रत्येकी तीन दिवस याप्रमाणे वापरावे असे सांगितले होते. त्यानुसार गेल्या 4 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 2:30 वा. सुमारास भैरू चांदीलकर शेतातील विहिरीचे पाणी जनावरांसाठी भरत होते.
त्यावेळी उपरोक्त आरोपींनी पाण्याची पाळी आमची असताना तू पाणी का सुरू केलेस? असा जाब विचारून भांडणाला सुरुवात केली. या भांडणाचे पर्यवसान मारामारीत होऊन भैरू यांना लोखंडी फावडा व काठीने जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे गंभीर जखमी भैरू चांदीलकर यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले.
याप्रकरणी जखमी भैरू यांचा मुलगा ज्ञानेश्वर चांदीलकर याने बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन उपरोक्त तिघा संशयतांना अटक केली. तसेच न्यायालयात दोषारोप दाखल केल्यामुळे बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयात सुनावणी सुरू होती. सुनावणी वेळी साक्षीदारातील विसंगतीमुळे तिघाही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्यावतीने ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.