बेळगाव लाईव्ह : जय किसान भाजी मार्केट असोसिएशनने काही सदस्यांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या उपनिबंधकांना निवेदन सादर करून आपल्या बाजूने स्पष्ट भूमिका मांडली आहे. संस्थेच्या कारभारात कोणतीही गैरप्रकार, जबरदस्ती किंवा अन्याय न झाल्याचा ठाम दावा या पत्रात करण्यात आला आहे.
जय किसान भाजी मार्केट असोसिएशन ही 230 सदस्यांची नोंदणीकृत संस्था असून, गेली 30 ते 40 वर्षे ही संस्था नियमितपणे कार्यरत आहे. संघाच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक पाच वर्षांनी संस्थेच्या कार्यकारिणीची निवड सर्वसामान्य सहमतीने व कोणत्याही विरोधाशिवाय पार पडते. संघाने 29 फेब्रुवारी 2024 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सभेत संस्थेचे आर्थिक हिशेब, सर्व व्यवहार सादर करण्यात आले असून, त्याचा ऑडिट अहवाल उपनिबंधक कार्यालयाकडे दरवर्षी प्रमाणेच सादर केला आहे.
संस्थेतील सदस्य नोंदणी प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहे. कोणत्याही सदस्याला जबरदस्तीने दुकान विलीनीकरण करायला लावले गेलेले नाही आणि कोणाकडूनही अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात आलेली नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संस्थेने सर्व दुकानदारांना अधिकृत विलीनीकरण पत्र दिले आहे.
तसेच, महापालिकेचा कर संस्थेच्या नावे येतो व तो प्रत्येक दुकानदाराकडून स्टेअर फूट प्रमाणे विभागून घेतला जातो. संस्था कोणत्याही प्रकारच्या अमिषाला बळी न पडता आणि कोणावरही अन्याय न करता कार्यरत आहे. सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणांनंतरच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येईल, असे संघाने स्पष्ट केले आहे.
सध्याची कार्यकारिणी कोणावरही अन्याय न करता काम करत असून, उर्वरित कामे पूर्ण करून लवकरच नवीन कार्यकारिणीसाठी निवडणुकीस मदत केली जाईल. काही सदस्यांच्या वैयक्तिक तक्रारीच्या आधारे कोणताही निर्णय घेऊ नये, तर त्या तक्रारींची सखोल चौकशी व्हावी, अशी विनंती संघाने आपल्या निवेदनात केली आहे. यावेळी जय किसान भाजी मार्केट असोसिएशनचे विविध सदस्य उपस्थित होते.