बेळगाव लाईव्ह : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाच्या आंदोलनात १ जून १९८६ रोजी शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हिंडलगा येथे भव्य हुतात्मा स्मृती भवन उभारण्यात येणार आहे. मात्र, मराठी विरोधी कर्नाटकी प्रशासन आणि कन्नड संघटनांच्या विरोधामुळे या स्मृती भवनाच्या उभारणीवर संकट घोंघावत आहे.
गेल्या रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हुतात्मा स्मृती भवनाच्या बांधकामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या तीन मजली इमारतीत सीमावादाच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण, हुतात्म्यांच्या स्मृती, आणि ऐतिहासिक छायाचित्रांचे संकलन केले जाणार आहे. मात्र, या स्मृती भवनाच्या उभारणीला बेळगाव जिल्हा कन्नड संघटनांच्या कृती समितीने कडाडून विरोध दर्शवला आहे.
कन्नड संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी या स्मृती भवनाला विरोध दर्शवत, जिल्हा प्रशासनाने या जमिनीचे बिगरशेतीकरण करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती शहीदांच्या बलिदानाचा राजकीय फायदा घेत असून स्मृती भवनाचा वापर लोकांना भडकवण्यासाठी करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली असून या विरोधानंतर हुतात्मा स्मृती भवनाच्या उभारणीवर प्रशासनाची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठी हुतात्म्यांच्या स्मरणासाठी उभारण्यात येणाऱ्या या स्मारकाला विरोध करून कर्नाटक सरकारचा पक्षपाती दृष्टिकोन पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रशासनाने जर स्मृती भवनाच्या कामात अडथळे निर्माण केले, तर महाराष्ट्र एकीकरण समिती मोठे आंदोलन उभे करेल, असा इशारा माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिला आहे.
हुतात्मा स्मृती भवनासाठी सुमारे २.७५ कोटी रुपयांचा निधी देणगी स्वरूपात संकलित केला जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे वरिष्ठ नेते आर. एम. चौगुले यांनी आपल्या कुटुंबातर्फे देखील आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. बेळगावातील हुतात्म्यांचे बलिदान अजरामर करण्यासाठी आणि सीमावादाच्या इतिहासाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतलेला हा निर्णय कर्नाटकी प्रशासनाला मान्य नाही का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मराठी हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी मराठी अस्मितेच्या प्रतीक म्हणून या स्मृती भवनाच्या उभारणीला अधिकाधिक मदतीचा हात द्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.