बेळगाव लाईव्ह :हिंडलगा येथे हुतात्मा स्मृती भवन उभारण्याच्या प्रस्तावाला कडव्या विरोधाचा सामना करावा लागत असून, कन्नड संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करत परवानगी नाकारण्याची मागणी केली आहे.
बेळगाव शहरासह जिल्ह्यात मराठी आणि कन्नड भाषिकांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, महाराष्ट्र एकीकरण समितीला हिंडलगा येथे हुतात्मा स्मृती भवन उभारण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी बेळगाव जिल्ह्यातील कन्नड संघटनांच्या कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाचे सादरीकरण बुधवारी सकाळी समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, समाजात शांतता, सहिष्णुता आणि सौहार्द टिकवणे ही जिल्हा प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे या स्मृती भवनाच्या बांधकामाबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात येईल. तसेच प्रस्तावित इमारत उभारण्यात येणारी जागा बिगरशेती नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून, सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी होईपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास मनाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र एकीकरण समिती राजकीय लाभासाठी हुतात्म्यांच्या नावे स्मृती भवनाचे नियोजन करत आहे. या भवनात पोलिस गोळीबाराच्या कालखंडातील छायाचित्रे, तसेच कर्नाटक सरकार आणि कन्नड भाषिकांच्या विरोधातील माहितीपट प्रदर्शित करण्याची योजना आहे. त्यामुळे अशा प्रकारचे केंद्र हे जनतेत द्वेष निर्माण करणारे ठरेल, अशी शक्कल लढवत सदर निवेदन सादर करण्यात आले आहे.
यावर जिल्हाधिकारी रोशन यांनी प्रतिक्रिया देत, हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीत एका संघटनेकडून इमारत बांधण्याचा प्रयत्न सुरू असून, ती जागा अनधिकृत असल्याने त्या कामास परवानगी दिली जाऊ शकत नाही. यासंदर्भात नोटीस बजावली जात असून, कोणत्याही अटी व शर्ती पूर्ण न करता कोणालाही असे बांधकाम करता येणार नाही. शहरातील शांतता आणि सहिष्णुता टिकवण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
स्मृतिभवनाचे भूमिपूजन पार पडल्यानंतर कन्नड संघटनांची वळवळ सुरु झाल्याने यावर प्रशासनाचीही वक्रदृष्टी असल्याचे निदर्शनात येत होते. अखेर कन्नड संघटनांनी आपला कंडू शमवून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत इमारत बांधकामाची परवानगी देऊ नये असे सांगितले आहे. यावर महाराष्ट्र एकीकरण समिती कोणती भूमिका घेईल, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.