बेळगाव लाईव्ह : हिरेबागेवाडी गावातील सरकारी रुग्णालयासाठी ६० वर्षांपूर्वी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या भरपाईप्रकरणी महत्त्वपूर्ण निर्णय देत, बेळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचा आदेश दिला.
हिरेबागेवाडी येथे सरकारी रुग्णालयाच्या बांधकामासाठी ६० वर्षांपूर्वी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या भरपाईबाबत न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.
ब्रिटिशकालीन १८९४ च्या कायद्यानुसार, सर्व्हे क्रमांक १२५/२बी मधील फकीरप्पा दुर्गाप्पा तळवार यांची ३१ गुंठे, मल्लिकार्जुन तळवार यांची १ एकर २ गुंठे आणि अशोकाताई तळवार यांची ३० गुंठे जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, अद्यापही जमीन मालकांना भरपाई मिळालेली नाही.
या संदर्भात न्यायालयाने जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचा आदेश दिला. आदेशानंतर, संबंधित गाडी जप्त करण्यात आली असली तरी काही कर्मचाऱ्यांनी गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार लक्षात येताच वकिलांनी हा न्यायालयाचा अपमान असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर केले. यावेळी वकील आर. यांनी गाडीच्या चाव्या तातडीने सुपूर्द केल्या, तर एन. पाटील यांनी ती अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली.
हा संपूर्ण प्रकार जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला असून, न्यायालयाच्या आदेशानंतर आरोग्य विभागाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.