बेळगाव लाईव्ह : जिद्द चिकाटी आणि महिन्यात असेल तर सरकारी शाळेत शिक्षण घेतलेला देखील युपीएससी पास होऊ शकतो हे बेळगाव जिल्ह्यातल्या एका युवकांने साध्य करून दाखवले आहे.
हणुमंतप्पा वडील आणि भाऊ मेंढपाळ आई शेतमजूर कुटुंबातील सर्वजण शेतकरी म्हणून काम करतात. घरात गरिबीचे सावट असताना हणुमंतप्पा याने सर्व अडचणींवर मात करत यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले आहे.
यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेत बेळगाव जिल्ह्यातील एकमेव हणमंतप्पा यल्लप्पा नंदी याने 910 वा क्रमांक पटकावला. यूपीएससी परीक्षेत यंदा जिल्ह्यातून हणमंतप्पा हा एकमेव यशस्वी विद्यार्थी आहे. तो कोडलीवाड सत्तीगेरी (ता. यरगट्टी) येथील असून त्याच्या या यशाबद्दल कौतूक होत आहे.यूपीएसी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. 22) जाहीर करण्यात आला.

मी आठव्या प्रयत्नात उत्तीर्ण झालो. हे खूप रोमांचक आहे. मी तीन वेळा यूपीएससी मुख्य परीक्षा दिली होती. मी केपीएससी मुख्य परीक्षेचाही अभ्यास करत होतो. मी माझे हे यश माझ्या पालकांना समर्पित करतो. मित्रांनी मला खूप मदत केली आहे. मी लहान असताना सत्तीगेरी हॉस्टेलचे वॉर्डन एस.के. पाटील यांनी स्वतः मला यूपीएससी परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले. मला मदत करणार्या प्रत्येकाचा मी सदैव आभारी आहे, असे हणमंतप्पा याने सांगितले. हणमंतप्पाला भारतीय रेल्वे सेवा किंवा भारतीय महसूल सेवेत पद मिळण्याची शक्यता आहे.
हनुमंतप्पाने त्यांच्या मूळ गावी कोडलीवाड येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेतले आणि सत्तीगेरी सरकारी हायस्कूलमध्ये 8-10 इयत्ता पूर्ण केली. त्याने धारवाड येथील केसीडी कॉलेजमधून पीयूसी पूर्ण केले आणि बेळगाव येथील गोगटे कॉलेजमधून बीई मेकॅनिकल पदवी प्राप्त केली होती.
बंगळूरमध्ये एका खोलीत राहून यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करत होता या खडतर प्रवासातून हनुमंतप्पा यांनी मिळवलेले हे यश बेळगाव जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना आदर्शवत ठरणारे आहे यात तिळमात्र शंका नाही.