बेळगाव लाईव्ह: शेतकरी शिक्षक आणि सैनिक हेच देशाचे रक्षक आहेत असे मत कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडले. रविवारी दुपारी सुवर्ण सौधा येथील विधानसभा भवनात कृषी विभागाच्या अनुदान योजनेअंतर्गत सुमारे 400 कोटी रुपयांची कृषी यंत्रे आणि साधने शेतकऱ्यांना वितरित करताना त्यांनी हे विधान केले.
“शेतकऱ्यांना 40% आणि अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना 50% सवलतीच्या दरात कृषी यंत्रे पुरवली जात आहेत. कृषी कामगारांच्या कमतरतेमुळे शेतकरी आता यंत्रांवर अधिक अवलंबून आहेत. म्हणूनच सरकार सवलतीच्या दरात ही यंत्रे वितरित करत आहे,” असे ते म्हणाले.
“आम्ही ‘कृषिभाग्य’ योजना कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी लागू केली आहे. गेल्या वर्षी 25 हजाराहून अधिक कृषी तलाव बांधले. यावर्षी ही संख्या आणखी वाढेल. कृषी तलाव ही अत्यंत उपयुक्त योजना आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे,” असे त्यांनी नमूद केले.

“आता आपण अन्नउत्पादनात स्वावलंबी झालो आहोत. आमच्या सरकारच्या कारकिर्दीत, तुमच्या (शेतकऱ्यांच्या) प्रयत्नांमुळेच ‘अन्नभाग्य’ योजनेअंतर्गत दर महिन्याला 10 किलो तांदूळ वाटणे शक्य झाले आहे,” असे स्पष्ट केले.
“सिंचन प्रकल्पांसाठी आमचे सरकार 23 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. भद्रा मेलदंडे प्रकल्पाला आजपर्यंत केंद्र सरकारने एक पैसाही दिला नाही. म्हादाई आणि मेकेदाटू प्रकल्पांना केंद्राची मंजुरीच मिळत नाही. केंद्र सरकारने मंजुरी दिली तर आम्ही ताबडतोब या सर्व सिंचन प्रकल्पांना सुरुवात करण्यासाठी तयार आहोत,” अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.