बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज विविध मुद्द्यांवर तासभर चर्चा रंगली. करवाढ, वाहतूक मार्ग, थकीत देणी, जाहिरात फलकांचे टेंडर, आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ही सभा गाजली. दक्षिण आमदारांनी यांनी जनतेवर आर्थिक भार येऊ नये म्हणून मालमत्ता कर फक्त 3 टक्क्यांनी वाढवण्याची शिफारस केली. ओल्ड पीबी रोडचे कामही ऐरणीवर आले, तर मनपाच्या एका अधिकाऱ्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झाले.
शनिवारी पार पडलेल्या बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत, मालमत्ता करवाढीच्या प्रस्तावावर जोरदार चर्चा झाली. सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांवर आर्थिक भार नको, म्हणून फक्त 3 टक्के करवाढ करण्यात यावी, अशी शिफारस आमदारांनी केली. या प्रस्तावास महापौर मंगेश पवार, आयुक्त शुभा बी यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.
सभेत ओल्ड पीबी रोडचा मुद्दाही चर्चेत आला. तानाजी गल्ली बंद झाल्याने वाहतूककोंडी वाढली असून, शिवचरित्रसारख्या ऐतिहासिक स्थळावरही याचा परिणाम होत आहे. यावर सर्वसहमतीने चर्चा करून निर्णय घेण्याचे महापौरांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी मराठी परिपत्रकाचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय कोणत्याही प्रकारची नोटीस मराठीतून देण्याची मागणी केली. यासंदर्भातील आदेश देखील त्यांनी महापौरांना दाखविले. यावर महामापौरांनी सदर मागणीचा विचार केला जाईल, असे सांगितले. प्रत्येक बैठकीत मराठी परिपत्रके आणि नोटीस देण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र प्रत्येकवेळी मराठी नगरसेवकांच्या पदरी निराशाच पडते, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केले.
सभेत आणखी एक ठळक मुद्दा होता तो म्हणजे टिळकवाडीतील क्लबवर 2 कोटी 63 लाख रुपयांची लीज थकबाकी असतानाही कारवाई न झाल्याबाबतची नाराजी. या क्लबला लीजवर दिलेली जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बुधवारपर्यंत नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले.
याशिवाय, टेंडर संपल्यानंतरही शहरात जाहिरात फलक लावून महापालिकेचे उत्पन्न बुडवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. अधिकारी गप्प का? असा सवाल देखील सभेत उपस्थित झाला.
तसेच, नगरसेवक रियाज किल्लेदार यांनी मनपाच्या एका अधिकाऱ्यावर नगरसेवकांकडूनच 25 हजार रुपये लाच मागितल्याचा आणि सहा एजंटांच्या माध्यमातून दलालीचे जाळे रचल्याचा आरोप केला. “जर नगरसेवकांनाच अशी वागणूक मिळत असेल, तर सामान्य जनतेचे काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.
या सभेला उत्तर आमदार असिफ सेठ महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, आयुक्त शुभा बी, लक्ष्मी निपाणीकर व इतर अधिकारी उपस्थित होते.