बेळगाव लाईव्ह :एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत बेळगाव महानगरपालिकेच्या अर्थ स्थायी समितीने बुधवारी कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील निवासी वसाहती, बाजारपेठा, बंगले, मैदाने आणि मोकळ्या जागा महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यास सुलभ करण्याचा ठराव मंजूर केला आहे.
अर्थ स्थायी समितीच्या अध्यक्षा नेत्रावती भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी आणि इतर प्रमुख सदस्य उपस्थित होते. यापूर्वी महापालिकेने केवळ निवासी वसाहतींचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्यास ‘ना हरकत’ असल्याचा ठराव सर्वसाधारण बैठकीत केला आहे.
तथापि बाजारपेठ, बंगले, मैदाने व खुल्या जागेच्या हस्तांतरणाबाबत समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे त्या सर्वांच्या हस्तांतरणाबाबतचा ठराव महापालिकेत मंजूर करून घ्यावा अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडून मिळाली होती. त्यानुसार स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करून उपरोक्त निर्णय घेण्यात आला.
आता या निर्णयानुसार हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. कॅन्टोन्मेंट हस्तांतरणाची सद्यस्थिती काय आहे? याबाबतची सविस्तर माहिती महापालिकेच्या महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी बैठकीत दिली त्यानंतर वरील निर्णय एकमताने घेण्यात आला.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड सध्या एकूण 1,763 एकर जमीन व्यवस्थापित करते. उपरोक्त ठरावामुळे कॅन्टोन्मेंटचे कांही भाग बेळगाव महानगरपालिका हद्दीत एकत्रित करण्याच्या मोठ्या योजनेशी सुसंगत संपूर्ण हस्तांतरण प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.