बेळगाव लाईव्ह :लक्ष्मीनगर, गणेशपुर बेळगाव येथील अपार्टमेंटमध्ये गेल्या सोमवारी सायंकाळी अंजना अजित दड्डीकर या महिलेचा गळा दाबून खून करून तिच्या अंगावरील सोन्याच्या मंगळसूत्रासह अन्य दागिने लंपास केल्या प्रकरणाचा छडा लावताना कॅम्प पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघा महिलांना अटक केली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे ज्योती बांदेकर आणि सुहानी बांदेकर अशी असून त्यांच्यासोबत एक अल्पवयीन मुलगा देखील आहे. खुनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी मयत अंजना यांची मुलगी अक्षता सुरज पाटील हिने आपल्या आईची कोणी अज्ञातांनी हत्या करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार कॅम्प पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गेल्या बुधवारी 23 एप्रिल रोजी खून व चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला होता. त्यानंतर बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी चेतन सिंग राठोड पोलीस उपायुक्त कायदा सुव्यवस्था रोहन जगदीश पोलीस उपायुक्त गुन्हे रहदारी निरंजन राज रस आणि खडे बाजार उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व श्रीमती ए. रुक्मिणी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने वेगाने तपास चक्रे फिरवून उपरोक्त तिघा जणांना गजाआड केले. तसेच त्यांच्या जवळील एक लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मयत अंजना दड्डीकर हिने आरोपींना उसनवार पैसे दिले होते. ते पैसे परत मिळावेत यासाठी तिने तगादा लावला होता. त्या तगाद्यामुळे त्रासलेल्या ज्योती बांदेकर आणि सुहानी बांदेकर या आपल्या सोबत एका मुलाला घेऊन अंजनाच्या घरी गेल्या. त्यानंतर त्यांनी अंजना हिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेण्याबरोबरच तिचा गळा दाबून खून केल्यानंतर अंगावरील सोन्याचे अन्य दागिने लांबविले होते. सदर खून प्रकरणाचा युद्धपातळीवर छडा लावल्याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शाबासकी दिली आहे.