बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील सीपीएड मैदानावर काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान बचाव’ आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भाषणावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी काळे निशाण दाखवत घोषणाबाजी करत गोंधळ घातला. या प्रकारानंतर पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना अटक करून जिल्हा न्यायालयात हजर केले. संपूर्ण प्रकरणामुळे काही काळ वातावरण तापले होते.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे भाषण सुरु होताच भाजपच्या पवित्रा हिरेमठ, शिल्पा केकरे, सुषमा भरमूचे, मंजुळा हन्नीकेरी आणि अन्नपूर्णा हावळ यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत काळे निशाण दाखवले. गोंधळामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधीच पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलक महिला कार्यकर्त्यांना अटक केली.
महिला कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर सभेतील पोलीस विभागाच्या दुर्लक्षपणाला कारणीभूत ठरवत पोलीस वाहनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचा हिसका दाखवत महिला कार्यकर्त्यांना पोलीस वाहनाद्वारे सुरक्षितपणे कॅम्प पोलीस ठाण्याकडे रवाना केले.
कॅम्प पोलीस ठाण्यात नेताच भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी भाजप कार्यकर्ते मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ प्रत्युत्तरात घोषणा दिल्या. परिणामी पोलीस ठाण्यासमोर मोठा गोंधळ झाला. अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची सीपीआय परशुराम पूजारी आणि पीएसआय रुक्मिणी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

या संपूर्ण प्रकरणावर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील आणि भाजप नेते मुरुघेंद्रगौडा पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना कोणत्याही पोलीस ठाण्यात न नेता ‘सीटी रवी’ प्रकरणासारखे आणखी एक खोटे प्रकरण घडवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात असल्याचा आरोप केला.
पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली आहे, जी पाकिस्तानी मीडियातही झळकत आहे. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा शिल्पा केकरे यांनी यावर सवाल उपस्थित करताच काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून आले, असा आरोप भाजप नेत्यांनी केला.
दरम्यान, काँग्रेसच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा आटापिटा करावा लागला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून पुढील संभाव्य गोंधळ टाळला असला तरी आता या मुद्द्यावरून पुढील काही दिवस राजकारण तापण्याची शक्यता आहे.