बेळगाव लाईव्ह : जातनिहाय जनगणना अहवालाचा वापर काँग्रेस सत्तेचा टिकाव लावण्यासाठी करत असून, हा अहवाल म्हणजे समाजात तेढ निर्माण करण्यासाठी वापरले जाणारे काँग्रेसचे ‘राजकीय अस्त्र’ असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केला आहे.
बेळगावच्या सांबरा विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना विजयेंद्र यांनी काँग्रेस सरकारवर घणाघात केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपल्या खुर्चीच्या बचावासाठी जातनिहाय जनगणना अहवाल पुढे करत आहेत.
२०१५ मध्ये झालेल्या या जनगणनेचा अहवाल इतकी वर्षं दडवून ठेवण्यात आला आणि आता सत्तेच्या संकटाच्या छायेत तो अचानक पुढे आणला जातो आहे. हा अहवाल कालबाह्य झाला असून, तो अंमलात आणणे म्हणजे समाजात दुही पसरवण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे. काँग्रेसचे हे धोरण जनतेला विभाजित करून निवडणूक फायद्याची रणनीती आहे. मात्र जनता या भंपकपणाला भुलणार नाही, भाजपच खऱ्या अर्थाने मागासवर्गीय, शोषित आणि गरीब घटकांसाठी काम करत आहे. काँग्रेस पक्षाला समाजाच्या कल्याणाशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना केवळ सत्तेचा हव्यास आहे, अशी टिका त्यांनी केली.
भाजपने सुरू केलेल्या ‘जनआक्रोश यात्रे’चा उल्लेख करत विजयेंद्र म्हणाले की, राज्यातील जनतेत काँग्रेस सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. ही यात्रा जनतेच्या मनातील रोष व्यक्त करणारी असून, लवकरच काँग्रेस सरकारला जनतेकडून चपराक बसणार आहे.
या पत्रकार परिषदेला विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक, भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, नगराध्यक्षा गीता सुतार यांच्यासह भाजपचे अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.