बेळगाव लाईव्ह विशेष: वडिलांचे छत्र हरपलेलं, घरची परिस्थिती हालाकीची, नोकरीची सक्त गरज… पण या सगळ्या अडचणींना न जुमानता शरीर सौष्ठवाच्या माध्यमातून आयुष्य घडवणाऱ्या एका मराठी मुलाची ही थक्क करणारी वाटचाल आहे. ही कहाणी आहे बेळगावातल्या एका सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि भारतीय रेल्वेतील पहिल्या आशियाई पदकविजेत्या शरीर सौष्ठवपटू सुनील आपटेकर यांची….ज्यांनी केवळ कष्टाच्या बळावर चार सरकारी नोकऱ्या मिळवल्या आणि शेकडो तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरले.
परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती यशाच्या मार्गात अडथळा ठरत नाही, हे सिद्ध केलंय बेळगावातील सुनील आपटेकर यांनी. शरीरसौष्ठव क्षेत्रातील त्यांची वाटचाल ही जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी कहाणी आहे. सरकारी सेवेत एकामागून एक मिळवलेली नोकरी, सातत्यपूर्ण स्पर्धा आणि सन्मान, आणि आता ३५ वर्षांनंतरची सन्मानपूर्वक निवृत्ती… त्यांच्या जीवनाचा प्रत्येक टप्पा आजच्या तरुणांसाठी दीपस्तंभ ठरतो. आगामी 30 एप्रिल रोजी भारतीय रेल्वेच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर बेळगावातील मराठी पत्रकारानी त्यांची भेट घेत संवाद साधला. बेळगावच्या खेळाच्या इतिहासात एक मानाचे स्थान मिळवलेल्या सुनील आपटेकर यांनी आपली जीवनगाथा यावेळी मांडली. बेळगावात राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक्स स्पर्धा भरवणे आणि बेळगाव मधून ऑलिंपिक खेळाडू घडवणे हेच इथून पुढचे उद्दिष्ट आणि स्वप्न आपल्याला त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.
घरची परिस्थिती हलकीची असल्यामुळे सुनील आपटेकर यांना लवकर नोकरी मिळवण्याची गरज होती. परंतु या गरजेने त्यांच्या मनातील खेळाची जिद्द कमी केली नाही. शरीरसौष्ठव क्षेत्रात त्यांची प्रगती सुरु होती आणि देवाच्या कृपेने त्यांना एकामागून एक चार सरकारी नोकऱ्या मिळाल्या. पहिली नोकरी हिंदुस्थान लेटेक्समध्ये, त्यानंतर दक्षिण मध्य रेल्वे, नंतर सीआयएसएफ आणि शेवटी दक्षिण पश्चिम रेल्वेतील सेवा. दक्षिण रेल्वेत असताना त्यांना समजले की रेल्वे खाते उत्कृष्ट खेळाडूंना प्रोत्साहन देते.
यामुळे त्यांच्या मनात क्रीडा कोट्यातूनच रेल्वेत येण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी सिकंदराबाद येथे जाऊन शरीरसौष्ठव प्रशिक्षक बेनी फ्रान्सिस यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी आपटेकर यांना “तू खूपच कमजोर आहेस” असे सांगून निराश केले. याच शब्दांनी आपटेकर यांच्या मनात आग पेटली. त्यांनी हे अपमान रूपी इंधन करत स्वतःला सिद्ध करण्याचा निश्चय केला.
त्यानंतर सीआयएसएफ मध्ये काम करत असताना, बेंगळुरु येथे स्पर्धेदरम्यान दक्षिण रेल्वेचे प्रशिक्षक श्री. थिरुवेंगडम यांच्या नजरेत आले. त्यांनी रेल्वेमधील खेळाडू म्हणून संधी दिली आणि तिथून त्यांच्या विजयी वाटचालीला सुरुवात झाली. ते सात वेळा ऑल इंडिया रेल्वे चॅम्पियन, चार वेळा मिस्टर साऊथ इंडिया, आणि तीन वेळा मिस्टर इंडिया झाले. इतकंच नव्हे तर, आशियाई पदक जिंकणारे भारतीय रेल्वेचे पहिले शरीरसौष्ठवपटू होण्याचा मानही त्यांनी मिळवला. ते सध्या मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांच्या झोनल पथकात (PCCM झोनल स्क्वॉड) प्रमुख निरीक्षक म्हणून कार्यरत असून या महिन्यात ते ३५ वर्षांच्या निष्ठावान सेवेनंतर निवृत्त होत आहेत.
आपल्या सेवा काळात त्यांनी केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर नोकरीमध्येही संपूर्ण प्रामाणिकपणा राखला. भारतीय रेल्वेने त्यांना केवळ ओळखच दिली नाही, तर संपूर्ण आयुष्य घडवले, असे ते म्हणतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना उत्तम वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचा सहवास लाभला, ज्यामुळे त्यांचा प्रवास आणखी समृद्ध झाला. आपटेकर यांनी बेळगावातील अनेक तरुणांना प्रेरणा दिली. त्यांच्या प्रेरणेतून शेकडो तरुण व्यायामाकडे वळले. त्यांच्या प्रयत्नातून बेळगावमध्ये अनेक आधुनिक जिम सुरू झाल्या. त्यांनी बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डिंग असोसिएशनची स्थापना करून हजारो शरीरसौष्ठव स्पर्धांचे आयोजन केलं.
आता निवृत्तीनंतर त्यांचं नवीन स्वप्न आहे, बेळगावमध्ये राष्ट्रीय दर्जाच्या ॲथलेटिक्स स्पर्धा भरवून भारतासाठी एक तरी ऑलिंपिकपटू तयार करायचा! त्यांची ही जिद्दीची, प्रेरणादायी आणि मेहनतीची कहाणी केवळ एक खेळाडूचीच नाही, तर कर्तृत्वाने जीवन घडवणाऱ्या एका सामान्य माणसाच्या असामान्य प्रवासाची आहे यात तिळमात्र शंका नाही. सेवानिवृत्ती नंतर बेळगावातील खेळ प्रेमींनी देखील त्यांची ध्येयपूर्ती करण्यासाठी त्यांना साथ देणे दखील तितकेच गरजेचे आहे.टीम बेळगाव लाईव्ह कडून बेळगावच्या स्पोर्ट्स आयकॉन ला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!