बेळगाव लाईव्ह: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बेळगाव शहराची ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक 1 एक मे रोजी घेण्याचा निर्णय मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
शिवजयंतीच्या आयोजनासाठी मराठा समाजाचे देवस्थान शहरातील श्री जतीमठ देवस्थान येथे मध्यवर्ती मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
29 एप्रिल रोजी मंगळवारी सकाळी 9 वाजता बेळगाव शहरातील नरगुंदकर भावे चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती उत्सवाची स्थापना होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार करून पूजन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर याच ठिकाणी विविध भागातून येणाऱ्या शिव ज्योतींचे स्वागत मध्यवर्ती शिवजयंती मंडळाच्या वतीने केले जाणार आहे.
1 मे रोजी बेळगाव शहराची शिवजयंती चित्रपट मिरवणूक होणार आहे सायंकाळी 4 वाजता मारुती गल्लीतील मारुती मंदिर ते नरगुंदकर भावे चौकापर्यंत पालखी निघणार असून पालखी भावे चौकातून पूजन झाल्यानंतर चित्ररथ मिरवणुकीची सुरुवात होणार आहे.
मध्यवर्ती शिवजयंती मंडळाच्या वतीने 4 मे रोजी राजहंसगड येथे विविध स्पर्धा घेण्यात येणार असून ज्या कोणी स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी मंडळाला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगाव शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेली चित्ररथ मिरवणूक कशा पद्धतीने भव्य दिव्य सामाजिक संदेश देणारे आणि ऐतिहासिक देखावे सादर करणारी केली जाईल यासंदर्भात विचार विनिमय करण्यात आला.
बैठकीला माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण पाटील, नेताजी जाधव,गंगाराम पावले, दत्ता जाधव, शिवराज पाटील, विकास कलघटगी , मदन बामणे विजय पाटील, सागर पाटील, बाबू कोले, अनिल आमरोळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते