बेळगाव लाईव्ह :वैद्यकीय सहाय्यक म्हणून नोंदणीकृत हवाई योद्ध्यांच्या 16 आठवड्यांच्या प्रारंभिक प्रशिक्षणाच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त एअरमन ट्रेनिंग स्कूल बेळगाव येथे आयोजित त्यांचा निरोप समारंभ आज शनिवारी सकाळी उत्साहात पार पडला.
प्रारंभिक वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सदर प्रशिक्षणार्थींना त्यांच्या प्रशिक्षणाच्या व्यावसायिक टप्प्यासाठी आता वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र (एमटीसी), बेंगलोर येथे पाठवले जाणार आहे. निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी एअरमन ट्रेनिंग स्कूल बेळगावचे स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन राजदीप सिंग हे होते.
त्यांनीच प्रमुख पाहुणे या नात्याने एअरक्राफ्ट्समन (प्रशिक्षणार्थी) मुकल शर्मा याला ‘बेस्ट इन अकॅडमी’, एअरक्राफ्ट्समन (प्रशिक्षणार्थी) मनजीत भारती याला “बेस्ट इन आऊट डोअर ट्रेनिंग’, एअरक्राफ्ट्समन (प्रशिक्षणार्थी) नितज्ञ कटोच याला ‘बेस्ट मार्क्समन’ आणि एअरक्राफ्ट्समन (प्रशिक्षणार्थी)

अखिलेश जोशी याला ‘बेस्ट ऑल राऊंडर ऑफ द कोर्स’ या किताबाचे करंडक देऊन सन्मानित केले. समारंभास एअरमन ट्रेनिंग स्कूल बेळगावचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.