बेळगाव लाईव्ह : पहलगाम घटनेनंतर विदेशी नागरिकांबाबत व विशेषतः भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांबाबत चर्चा सुरू झाली आहे असे पाकिस्तानी नागरिक बेळगाव जिल्ह्यातही सहाजण आहेत.
परंतु, ते दीर्घावधी व्हिसा (एलटीव्ही) मिळवून राहात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर कारवार जिल्ह्यात १३ जण असून त्यातीलबहुतांश भटकळमध्ये वास्तव्यास आहेत.
राज्यातील पाकिस्तानी तसेच अन्य देशातील नागरिक बेकायदेशीर राहात असतील तर त्यांची सखोल चौकशी करून त्यांना देशाबाहेर हाकला, असे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. 27 एप्रिल ही अंतिम तारीख देण्यात आली आहे तशी सूचना त्यांनी गृहमंत्रालयालाही दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जिल्हानिहाय तपास सुरू केला आहे. बेळगाव जिल्ह्यात सहाजण
आयुक्तालय व जिल्हा पोलिस खात्याने याचा तपास सुरू केला असता गेल्या १० ते ३० वर्षांपासून दीर्घावधी व्हिसावर जिल्ह्यात ६ जण राहात असल्याची माहिती समोर येत आहे. जे लग्न होऊन इकडे येतात. अशा महिलांना व पुरुषांना या प्रकारचा व्हिसा दिला जातो. त्यांच्याकडे दीर्घावधी व्हिसा असून ते सध्या त्या आधारे भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे.
कोणत्याही घडामोडीत त्यांचा सहभाग आहे का, या दिशेनेही पोलिसांनी तपास केला असता सध्या तरी तसे काही आढळून आले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्या व्हिसावर आक्षेप घेता येत नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हाकलण्याचे निर्देश नाहीत
बेळगाव शहरात पाच तर जिल्ह्यात एक पाकिस्तानी नागरिक एलटीव्हीनुसार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, ते सर्वजण दीर्घावधी व्हिसानुसार येथे राहात आहेत. त्यांची गणना भारतीय नागरिक म्हणून होत नसली तरी लग्न करून इकडे आलेले असल्याने एलटीव्ही दिला जातो. त्यांची संपूर्ण चौकशीदेखील केली असून त्यांच्याबाबत आक्षेपार्ह काहीही आढळून आलेले नाही. शिवाय राज्य शासनाकडून त्यांना येथून त्यांच्या देशात पाठवण्याचे कोणतेही निर्देश नाहीत, अशी माहिती दोघा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.