बेळगाव लाईव्ह : “भगवान पंढरीनाथ काही काळ कर्नाटकात वास्तव्यास होते, म्हणूनच पंढरीनाथाला कानडीया विठोबा देखील म्हटलं जातं. कर्नाटक राज्य हे वारकरी संप्रदायाच्या निष्ठेचा वारसा जपणारे आहे. त्यामुळे जगद्गुरु संत तुकोबारायांच्या त्रिशतकी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथेही भव्य पारायण सोहळा व्हावा आणि कर्नाटकातील भाविकांनाही त्याचा लाभ घ्यावा, या हेतूने बेळगावमध्ये अखंड गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे,” असे मत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज श्रीगुरु पुंडलिक महाराज देहूकर यांनी व्यक्त केले.
आज शनिवारी बेळगाव शहरात अखंड गाथा पारायण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला भव्य आणि सवाद्य अशी दिंडी काढण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांवरून ते बोलत होते. राणी चन्नम्मा चौकातील श्री गणेश मंदिरापासून सुरू झालेली ही दिंडी अनगोळच्या संत मीरा शाळेजवळील पारायण स्थळी मार्गस्थ झाली. या दिंडीत तुकाराम महाराजांच्या पादुका असलेला पालखी रथ, सजवलेले हत्ती, घोडे, उंट आणि शेकडो वारकरी सहभागी झाले होते.
दिंडीमध्ये ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या जयघोषात टाळ-मृदंगाचा निनाद आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. कॉलेज रोड, टिळक चौक, कपिलेश्वर उड्डाणपूल, एसपीएम रोड मार्गे दिंडी पारायण स्थळी पोहचली. मार्गात कांगली गल्लीतील एकता युवक मंडळाकडून स्वागत करण्यात आले आणि सर्व वारकरी व भक्तांना पुलाव, शिरा व दहीभाताचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.

दिंडी दरम्यान ‘बेळगाव लाईव्ह’ शी संवाद साधताना श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले की, अनगोळ येथे होणाऱ्या अखंड गाथा पारायण सोहळ्याचा उद्देश हा वारकरी परंपरेचे जतन आणि हिंदू संस्कृतीचे संवर्धन हाच आहे. आपली परंपरा, संस्कृती, भक्तीचा वारसा हे केवळ जुने रूढीतच न ठेवता, ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. अशा भक्तिपर सोहळ्यांमुळे समाजात एकतेचा संदेश पोहोचतो आणि सामाजिक बंध अधिक दृढ होतात. हा पारायण सोहळा म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे तर एक अध्यात्मिक संस्कार शिबिर आहे, जिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध भक्तिप्रवृत्त कार्यक्रम राबवले जातात. काकडा भजन, हरिपाठ, गाथा पारायण, प्रवचन, कीर्तन आणि जागरण यामार्फत संपूर्ण आठवडाभर भक्तीचा आणि अध्यात्माचा अनुभव मिळणार आहे. या सोहळ्यांमधूनच आपण संस्कृती, संयम, सेवा, शिस्त आणि श्रद्धा यांचा प्रत्यय घेतो. आपण सर्वांनी मिळून या पारायण सोहळ्याला यशस्वी करावे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे सांगत सर्वांनी मोठ्या संख्येने पारायण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
२० ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत हरी ओम सत्संग सेवा संघ आणि गाथा पारायण सोहळा समिती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पारायण सोहळा पार पडणार असून, या आठवडाभराच्या सोहळ्यात काकडा भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, जागरण असे विविध कार्यक्रम होतील. हजारो गाथा ग्रंथ या ठिकाणी भाविकांसाठी आणण्यात आले आहेत. या सोहळ्याची सांगता २७ एप्रिल रोजी काला कीर्तन आणि अश्वांचे रिंगण यामधून होणार आहे. कर्नाटक राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच पारायण सोहळा असून, शहर, तालुका व जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे श्रीगुरु पुंडलिक महाराज देहूकर यांनी भावनिक आवाहन केले.