बेळगाव शहर व परिसरात सोमवारी सायंकाळी गारांसह वळवाच्या पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरणानंतर आलेल्या पावसामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला, मात्र जोरदार वादळी वाऱ्यामुळे आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे शहरात अडथळे निर्माण झाले.
सकाळपासूनच बेळगाव शहरात ढगाळ वातावरण होते. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळांमुळे त्रस्त नागरिकांना सायंकाळी आलेल्या गारांसह पावसाने थोडा दिलासा दिला. मात्र विजांच्या कडकडाटासह आलेल्या वळवाच्या पावसामुळे शहर आणि तालुक्यातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले.
सायंकाळच्या सुमारास बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक भागांत पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली.
नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, जिजामाता चौक, फोर्ट रोड अशा प्रमुख ठिकाणी गटारी भरून वाहत असल्याने सांडपाणी आणि पावसाचे पाणी रस्त्यावर ओसंडून वाहू लागले.
परिणामी दुर्गंधी पसरली असून नागरिकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बेळगाव तालुक्यातील विविध गावांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असून गार वेचण्यासाठी बच्चेकंपनीची धमाल सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सायंकाळी बेळगाव शहर परिसरात पावसाची सुरुवात होताच पुन्हा एकदा शहर ब्लॅक आऊट झाले होते सर्वत्र विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. सोसाट्याचा वारा आणि कडाडणारी वीज यामुळे कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसाचे चिन्ह होताच सायंकाळी प्रत्येक जण आपापल्या घरी लवकर जाण्याचा प्रयत्न करत होते.