बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात उन्हाचा पारा चढत असून, शुक्रवारी तापमान 34 अंश सेल्सिअसवर पोहोचले. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, उष्माघाताचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यातच उष्म्याचा प्रकोप वाढला आहे. शुक्रवारी शहराचे कमाल तापमान तब्बल 34 अंश सेल्सिअसवर पोहोचले. यंदाच्या उन्हाळ्यातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक तापमानाचा उच्चांक ठरला आहे.
गरिबांचे महाबळेश्वर अशी ख्याती असलेल्या बेळगावमध्येही उष्म्याने उच्चांक गाठला असून सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने अंगाची लाही होत आहे.
दुपारी रस्त्यावर वर्दळ तुलनेत कमी झाली असून, नागरिक उन्हापासून वाचण्यासाठी छत्री, टोपी, सनग्लासेस आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन बाहेर पडताना दिसत आहेत. वाढत्या उष्म्यामुळे अनेकजण गर्जेशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. गेल्या कांही दिवसात अवकाळी पावसाने हजेरी लावून देखील उन्हाची तीव्रता कमी झालेली नाही.
आरोग्य विभागाकडून नागरिकांना अधिक काळ उन्हात न थांबण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा आणि थंड पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात येत असून विशेषतः वृद्ध नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.