बेळगाव लाईव्ह :जम्मू आणि काश्मीरमध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा बेळगाव जिल्हा वकील संघटनेने तीव्र निषेध केला असून या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
बेळगाव जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. एस. एस. कीवडसन्नावर, उपाध्यक्ष ॲड. बसवराज मुगळी, ॲड. शितल रामशेट्टी आणि सरचिटणीस ॲड. यल्लाप्पा दिवटे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन पंतप्रधानांकडे धाडण्यासाठी आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ते त्वरित पंतप्रधान कार्यालयाकडे धाडण्याचे आश्वासन दिले. आम्ही बेळगाव जिल्हा वकील संघटनेचे सदस्य जम्मू आणि काश्मीरमध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याबद्दल अतिशय दुःख व्यक्त करून त्याचा तीव्र निषेध करत आहोत. शांतता प्रिय नागरिकांच्या विरोधातील हिंसाचाराची ही भ्याड कृती फक्त अमानवीच नसून हा देशाच्या एकता, शांतता आणि सौहार्दतेवरील हल्ला आहे.

आम्ही पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे असून हल्ल्याला जबाबदार असलेल्यांवर शक्य तितकी कठोर कारवाई करण्याची आमची भारत सरकारला विनंती आहे. त्याचप्रमाणे नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व असुरक्षित प्रदेशातील सुरक्षा उपाययोजना अधिक बळकट कराव्यात. कोणत्याही स्वरूपातील दहशतवाद दृढ निश्चयाने उखडून टाकला पाहिजे. संपूर्ण कायदेशीर समुदाय या निंदनीय कृत्याचा निषेध करत असून दुःखात देशासोबत सामील आहे. या निवेदनाच्या माध्यमातून निषेधाचा सामूहिक आवाज आम्ही उठवला आहे.
न्याय सुनिश्चित करण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा राखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना आमचा अटळ पाठिंबा आहे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी ॲड वाय के दिवटे,ॲड. विश्वनाथ सुलतानपुरी, ॲड. सुमितकुमार अगसगी, ॲड. इराण्णा पुजेर, ॲड. सुरेश नागनुरी, ॲड. अनिल पाटील, ॲड. अश्विनी हवालदार आदींसह संघटनेचे सदस्य असलेले वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.