बेळगाव लाईव्ह :मराठा जागृती निर्माण संघ बेळगाव यांच्यातर्फे येत्या रविवार दि. 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता ‘स्वर सुवर्ण’ या मराठी गीतांच्या संग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
येळ्ळूर रोड, वडगाव बेळगाव येथील श्री अन्नपूर्णेश्वरी मंगल कार्यालय येथे सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा जागृती निर्माण संघ बेळगावचे संस्थापक अध्यक्ष गोपाळराव नारायणराव बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार आणि मराठा समाजाचे स्वामी श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी उपस्थित राहणार आहेत. या उभयतांच्या हस्ते ‘स्वर सुवर्ण’ मराठी गीतांच्या संग्रहाचा प्रकाशन केले जाणार आहे.
याप्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून श्री अन्नपूर्णेश्वरी मंदिर व श्री अन्नपूर्णेश्वरी मंगल कार्यालय वडगावचे संचालक रविराज हेगडे हे सत्कार मूर्ती म्हणून, तर धर्मवीर श्री संभाजी हायस्कूल बैलूरचे मुख्याध्यापक एस. डी. पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर सोहळ्याचे औचित्य साधून रविवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शंकरराव पाटील, किणये यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
तरी हितचिंतकासह नागरिकांनी पुस्तक प्रकाशन सोहळा व भजनाच्या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहन मराठा जागृती निर्माण संघ बेळगावचे अध्यक्ष गोपाळराव बिर्जे यांनी केले आहे.