बेळगाव लाईव्ह :पर्यटन व पर्यावरण जागृतीला चालना देण्यासाठी आयोजित अरुणाचल प्रदेश ते आसाम या 1040 कि.मी. अंतराची खडतर मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करून परतलेल्या कोरे गल्ली शहापूर येथील सेना दलामध्ये कार्यरत योगेश भाऊराव पाटील या साहसीवीराचा गल्लीतील पंच कमिटी आणि सन्मित्र महिला मंडळ कोरे गल्ली यांच्यातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून खास सत्कार करण्यात आला.
शहापूर येथील कोरे गल्ली पंच कमिटी आणि सन्मित्र महिला मंडळ आयोजित महिला दिन कार्यक्रमाची सुरुवात श्री गंगापुरी महाराजांच्या समाधीचे पूजन करण्याद्वारे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोरे गल्लीचे जेष्ठ पंच सोमनाथ ना. कुंडेकर हे होते.
याप्रसंगी कोरे गल्ली पंचकमिटी तर्फे सागर हावळानाचे, सन्मित्र महिला मंडळातर्फे रश्मी मोहिते यांच्यासह मोहन पाटील, बाल हनुमान व्यायाम शाळेचे विनायक हावळानाचे, गजानन जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर महिला दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून सेनादलात कार्यरत योगेश भाऊराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गल्लीतील नागरिक, बाळगोपाळ आणि महिला मंडळाच्या पदाधिकारी सदस्यांसह हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंच कमिटीचे सल्लागार सुधीर नेसरीकर यांनी केले. शेवटी पंच कल्लाप्पा हंडे यांनी सर्वांचे आभार मानले.
सेनादलात कार्यरत कर्नाटकातील एकमेव योगेश पाटील याची पर्यटन आणि पर्यावरण जागृतीला चालना देण्यासाठी आयोजित अरुणाचल प्रदेश ते आसाम या 1040 कि.मी. अंतराची खडतर मोहिमेसाठी निवड करण्यात आली होती.
सदर 27 दिवसांच्या मोहिमेमध्ये ब्रह्मपुत्रा नदीत राफ्टिंग करणे यासह अन्य खडतर आव्हानांवर मात करत योगेश पाटील याने आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने सदर मोहीम यशस्वी केली. या मोहिमेच्या माध्यमातून शालेय शिक्षण कमी असलेल्या योगेश याने खेळाडूकडे जिद्द असेल तर तो यशाचे शिखर गाठू शकतो हे दाखवून दिले. यासाठीच शहापूरच्या कोरे गल्लीने वरील प्रमाणे साहसीवीर योगेशचा सत्कार करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.