एलअँडटी आणि पाणीपुरवठा महामंडळ अधिकाऱ्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांची अनुपस्थिती

0
3
City corporation
 belgaum

बेळगाव लाईव्ह : महापालिकेच्या 58 प्रभागांमधील पाणीपुरवठा व्यवस्था आणि समस्येबाबत चर्चा करण्यासाठी आज महापालिकेच्या मुख्य सभागृहात एलअँडटी आणि पाणीपुरवठा महामंडळ अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीला वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहिल्याने मनपा आयुक्तांनी सदर बैठक पुढे ढकलली. सदर बैठकीस उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांकडे समर्पक माहिती नसल्याचे निदर्शनात येताच मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत पुढील बैठकीत पूर्ण तयारीनिशी उपस्थित राहण्याचे कडक निर्देश दिले.

कडक ऊन.. पाणी टंचाई.. हतबल नागरिक आणि एल. अँड टी चे बेशिस्त अधिकारी यामुळे बेळगावकर ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे हैराण झाले आहेत. उन्हाच्या झळा वाढत असतानाच एल. अँड टी. कंपनीच्या बेशिस्त कारभारामुळे बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन ढासळले आहे. एकीकडे नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल आणि यावर तोडगा काढण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत गैरहजर राहिलेले बेशिस्त अधिकारी अशा परिस्थितीत उन्हाळ्यात बेळगावकरांचे पाण्यासाठी काय हाल होतील, याची धास्ती लागून राहिली आहे.

बेळगाव शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कामे सुरू असताना मुख्य जलवाहिन्यांना वारंवार गळती लागत आहे. नुकतीच लक्ष्मीटेक ते घुमटमाळ दरम्यानच्या जलवाहिनीला गळती लागल्याने दक्षिण भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. बेळगावच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सध्या एलअँडटी कंपनीकडे आहे. शहरात 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलवाहिन्यांचे काम सुरू आहे. मात्र, जुन्या मुख्य जलवाहिन्या वारंवार गळती होत असल्याने ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांना पाण्याची टंचाईचा सामना करावा लागत आहे.City corporation

 belgaum

दक्षिण भागातील जलवाहिनीला देखील गळती लागल्याने नागरिकांना टँकर, बोअरवेल आणि खाजगी विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मंगेश पवार यांनी आज बैठक बोलाविली होती. या बैठकीत एलअँडटी आणि पाणीपुरवठा महामंडळाच्या अधिकाऱ्यांची अनुपस्थिती दिसून आल्याने मनपा आयुक्त आणि नगरसेवक संतापले. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठकीत कोणताही ठोस निर्णय घेता आला नाही. यावेळी उपस्थित नगरसवेकांनी नाराजी व्यक्त करत अर्धवट कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. तसेच ऐन उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणीही नगरसेवकांनी केली.

पाणीपुरवठा व्यवस्था आणि समस्येबाबत चर्चा करण्यासाठी आता मनपा आयुक्तांनी ३ एप्रिल रोजी पुन्हा एकदा बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीला एल अँड टी , हेस्कॉम आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी सर्व माहितीनिशी, आवश्यक कागदपत्रे आणि अहवालासहित उपस्थित राहण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. गुरुवारी पार पडलेल्या बैठकीला महापौर मंगेश पवार , उपमहापौर वाणी जोशी, नगरसेवक हनुमंत कोंगाळी, रवी धोत्रे, शाहिद पठाण यांच्यासह, इतर अधिकारी आणि मनपा कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.