बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील वडगाव परिसरात गेल्या २९ वर्षांपासून सुरू असलेले मिरची कांडप यंत्र बंद करण्यासाठी आलेल्या महापालिका आरोग्याधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. स्थानिकांनी विरोध केल्यामुळे अधिकारी कारवाई न करताच परत गेले.
शनिवारी सकाळी ९ वाजता वडगावमधील कलमेश्वर रोडवर हा प्रकार घडला. देवांगनगर पहिल्या क्रॉसवरील कलमेश्वर रोड येथे शोभा अंबी गेल्या २९ वर्षांपासून मिरची कांडप व्यवसाय करत आहेत. मात्र, शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने यंत्राच्या आवाजाबाबत तक्रार केली होती.
त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून महापालिका कर्मचारी आणि शहापूर पोलीस त्यांना व्यवसाय बंद करण्यास सांगत आहेत. या प्रकरणी पोलिस ठाण्यात बोलावून समेट घडवण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, वडगाव परिसरात हातमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचा आवाजदेखील यंत्राच्या आवाजाइतकाच असतो, असा स्थानिकांचा युक्तिवाद आहे.
तज्ञांच्या मते, ७० डेसिबलपर्यंतचा आवाज त्रासदायक ठरत नाही, तर मिरची कांडप यंत्राचा आवाज केवळ ६८ डेसिबल आहे. तसेच, हा व्यवसाय वर्षातून केवळ तीन महिने चालतो, त्यामुळे तो बंद करण्याचा कोणताही ठोस आधार नाही, असे अंबी कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तरीही शनिवारी महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र, स्थानिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत त्यांना घेराव घातला.
नागरिकांचा वाढता विरोध पाहून आरोग्याधिकाऱ्यांनी यंत्र बंद करण्यासाठी आलेलो नाही, असे सांगत काढता पाय घेतला. या संपूर्ण घटनेवरून प्रशासनाच्या भूमिकेवर स्थानिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. प्रशासनाने न्याय्य निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.