बेळगाव लाईव्ह: बेळगाव महापालिकेतील भाजपच्या दोन नगरसेवकांना उच्च न्यायालया पाटोपाठ नगर विकास खात्याने देखील धक्का दिला आहे.खाऊ कट्टाप्रकरणी प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टेण्णावर यांनी नगरसेवक मंगेश पवार आणि जयंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द केले होते हाच निकाल राज्याच्या नगरविकास खात्याने कायम ठेवला असून दोघांचीही अंतरिम याचिका फेटाळली आहे.
गोवावेस येथे सार्वजनिक बांधकाम खात्याने उभारलेल्या खाऊकट्टा येथे मंगेश पवार आणि जयंत जाधव यांनी आपल्या पत्नींच्या नावाने गाळे घेतले होते पवार आणि जाधव नगरसेवक झाल्यानंतरही त्यांनी हे गाळे सोडले नाहीत. याशिवाय गाळ्यांच्या लिलावातही गैरप्रकार झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद यांनी प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टेण्णावर यांच्याकडे याचिका दाखल केली होती त्यानुसार शेट्टेण्णावर यांनी याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानंतर नगरसेवक आणि याचिकाकर्ते यांची सुनावणी झाली. सुनावणीनंतर प्रादेशिक आयुक्त शेट्टेण्णावर यांनी 10 फेब्रुवारी रोजी मंगेश पवार आणि जयंत जाधव यांनी महापालिका कायद्याचा भंग केल्याचा ठपका ठेवत दोघांचेही सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश दिला होता.
मंगेश पवार आणि जयंत जाधव यांनी प्रादेशिक आयुक्तांच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याठिकाणीही न्यायालयाने याचिका रद्द करत प्रादेशिक आयुक्तांचा निकाल कायम ठेवला होता. त्यामुळे दोघांनीही राज्याच्या नगरविकास खात्याच्या सचिवांकडे दाद मागितली होती.
मंगळवारी दुपारी नगरविकास खात्याच्या सचिव दीपा चोळण यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीनंतर सचिव चोळण यांनी प्रादेशिक आयुक्त आणि उच्च न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवत दोघांचीही अंतरिम याचिका फेटाळली. मंगेश पवार आणि जयंत जाधव यांची तिसर्यांदा याचिका फेटाळली आहे. त्यामुळे पद रद्द झालेले नगरसेवक आता पुढे कोणते पाऊल उचलणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे.