बेळगाव लाईव्ह :विमानांच्या उन्हाळी उड्डाण वेळापत्रकात कोणत्याही नव्या मार्गांचा अंतर्भाव नसल्याने बेळगावचा हवाई संपर्क (कनेक्टिव्हिटी) कमी होत चालला असून अनेक प्रमुख संपर्क तुटल्याचे स्पष्ट होते. एकेकाळी 15 हून अधिक गंतव्यस्थानांसाठी उड्डाणे असलेल्या बेळगाव शहराकडे आता फक्त सहाच गंतव्यस्थानं उरली आहेत.
इंडिगोचे वेळापत्रक कायम : उन्हाळ्यात प्रवाशांना दिलासा म्हणून इंडिगोने बेळगावहून तिचे तीनही विद्यमान मार्ग कायम ठेवले आहेत. इंडिगोची पुढील प्रमाणे सेवा सुरू राहील.
बेंगलोर (दररोज 2 उड्डाणे – सकाळ आणि संध्याकाळ). हैदराबाद (दररोज 1 उड्डाण). दिल्ली (दररोज 1 उड्डाण). हे मार्ग स्थिर राहिल्यामुळे प्रमुख केंद्रांशी सततची कनेक्टिव्हिटी सुनिश्चित झाली आहे. तथापी कोणताही विस्तार जाहीर झालेला नाही.
स्टार एअरचे बेळगावातील भविष्य अनिश्चित : बेळगावच्या हवाई कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्यात एकेकाळी प्रमुख भूमिका बजावणाऱ्या स्टार एअरने आपले कामकाज लक्षणीयरीत्या कमी केले आहे.
स्टार एअर पुढील प्रमाणे आपली सेवा सुरू ठेवेल. मुंबई (दररोज) अहमदाबाद (आठवड्यातून 4 वेळा – सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार). जयपूर (आठवड्यातून 3 वेळा – रविवार, सोमवार, गुरुवार). नागपूर (फक्त 15 एप्रिलपर्यंत, कारण या तारखेनंतर बुकिंग उपलब्ध नाही). नागपूर मार्गाभोवतीची अनिश्चितता 15 एप्रिलनंतर स्टार एअरच्या सेवेत आणखी घट होण्याचे संकेत देते.
हवाई संपर्कात मोठी घट : बेळगावहून विविध शहरांशी थेट संपर्क साधणाऱ्या व्यावसायिक प्रवासी, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी उड्डाणांमध्ये झालेली ही मोठी घट विशेष चिंताजनक आहे. गेल्या एप्रिल 2022 मध्ये बेळगाव हे मुख्यतः स्टार एअरद्वारे 15 शहरांशी जोडले गेले होते. तथापि गेल्या दोन वर्षांत अनेक मार्ग रद्द झाल्यामुळे आता फक्त सहा ठिकाणे उपलब्ध आहेत.
15 एप्रिल 2025 नंतर बेळगावची उड्डाण कनेक्टिव्हिटी : इंडिगो – बेंगलोर (दररोज 2 उड्डाणे), हैदराबाद, दिल्ली. स्टार एअर – मुंबई, अहमदाबाद, जयपूर. एकेकाळी जोधपूर, इंदूर, पुणे, नाशिक, तिरुपती, सुरत आणि इतर ठिकाणांशी संपर्क साधनाऱ्या विमानतळाला उडदानांच्या बाबतीत आता उतरती कळा लागली असून दुर्दैवाने त्यात सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
बेळगाव विमानतळ
प्रवाशांमध्ये चिंता : उन्हाळ्याच्या वेळापत्रकात नवीन मार्गांचा अभाव आणि हळूहळू कनेक्टिव्हिटी कमी होत असल्याने बेळगाव विमानतळावरून वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पर्यायांच्या कमी होत चाललेल्या संख्येबद्दल प्रवाशांमध्ये निराशा व्यक्त होत आहे. कारण त्यामुळे त्यांना एकेकाळी हवाई मार्गाने पोहोचणाऱ्या ठिकाणांसाठी रस्ते किंवा रेल्वे वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. स्टार एअरच्या विसंगत कामकाजावर विशेषतः उडान अनुदान संपल्यानंतर उड्डाणे बंद करण्याच्या इतिहासावर अनेकांनी टीका केली आहे. या एअरलाइनने सरकार-समर्थित योजनेबाहेर नवीन मार्गांचा शोध घेतला नसल्यामुळे कनेक्टिव्हिटी आणखी मर्यादित झाली आहे.
बेळगाव विमानतळासाठी पुढे काय? : सध्याच्या उन्हाळी वेळापत्रकात कोणतेही नवीन मार्ग उपलब्ध नसले तरी, मार्च 2025 पासून सुरू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकात नवीन उड्डाणे सुरू केली जाऊ शकतात, असे विमान वाहतूक तज्ञांचे मत आहे. तथापि स्टार एअरची अनिश्चितता आणि इंडिगोने कोणतीही विस्तार योजना जाहीर न केल्यामुळे बेळगावच्या हवाई संपर्काचे भविष्य अस्पष्ट आहे. सध्या प्रवासी फक्त नवीन विमान कंपन्या किंवा शहराचे एकेकाळचे भरभराटीचे हवाई नेटवर्क पुनर्संचयित करण्यासाठी अतिरिक्त मार्गांची आशा करू शकतात.