बेळगाव लाईव्ह : उन्हाच्या कडाक्याने जीव हैराण झाला असताना पूर्वी घराघरांत गूळ-पाणी, कांदा, लिंबू सरबत, आंब्याचे पन्हे यांसारखी पारंपरिक शीतपेये दिली जात. पण आजच्या आधुनिक युगात यांची जागा कोल्ड ड्रिंक आणि साखरयुक्त फास्ट फूड पदार्थांनी घेतली आहे. पारंपरिक शीतपेयांचा विसर पडल्याने तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा वाढल्या असून, दुपारच्या वेळी अंगाची लाही-लाही होत आहे. पूर्वी गावाकडील घरांमध्ये उन्हात फिरून आलेल्या पाहुण्यांना गूळ-पाणी देऊन स्वागत केले जायचे.
तोंडाला गोडवा आणि शरीराला थंडावा देणाऱ्या या परंपरेमागे वैज्ञानिक दृष्टिकोन होता. पण आजच्या पिढीला हे पेय नको असतात, त्याऐवजी फॅन्सी कोल्ड ड्रिंक्स आणि सोडायुक्त पेये प्राधान्य दिले जात आहे.
गूळ-पाणी, लिंबू सरबत, आंब्याचे पन्हे, उसाचा रस, कोकम सरबत, बेलसरबत, ताक, आंबील, सोलकढी, नारळपाणी अशी कित्येक पारंपरिक शीतपेये फक्त जुन्या आठवणींमध्ये राहिली आहेत. पूर्वीच्या लोकांनी हवामानानुसार आहार ठरवला होता. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी ही पेये आवश्यक असताना ती मागे पडत आहेत.
कोल्ड ड्रिंक्समध्ये प्रचंड प्रमाणात साखर आणि रासायनिक पदार्थ असतात. हे शरीरासाठी हानीकारक असून पचनसंस्थेवर वाईट परिणाम करतात. त्यामुळे उन्हाळ्यात पोटाच्या तक्रारी वाढतात, चक्कर येते, अशक्तपणा जाणवतो. अशा परिस्थितीत जुन्या परंपरांना जपण्याची गरज आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण फास्ट फूड आणि पाश्चिमात्य पेयपदार्थ स्वीकारतोय, पण यामुळे आपले आरोग्य धोक्यात येत आहे. उन्हाळ्याच्या या कडक उन्हात कोल्ड ड्रिंक्सऐवजी पारंपरिक शीतपेयांकडे वळले पाहिजे. पाहुण्यांचे स्वागत करताना गूळ-पाणी किंवा लिंबू सरबत दिल्यास त्यांच्या शरीरालाही आराम मिळेल आणि परंपराही टिकेल. अन्यथा पुढच्या पिढ्यांना ही चव कधीच कळणार नाही.
कोल्ड ड्रिंक्स आणि फ्रिजमधील पाणी प्यायल्याने शरीराला अचानक थंडावा मिळतो, मात्र त्यामुळे सर्दी-खोकला होण्याची शक्यता वाढते. दुसरीकडे, पारंपरिक गूळ-पाणी, ताक, आणि आंब्याचे पन्हे शरीरातील उष्णता संतुलित करून थंडावा देतात. त्यामुळे उन्हाळ्यात असे पेय अधिक प्रमाणात घेतली पाहिजेत.
आधुनिक काळात फास्ट फूड आणि कोल्ड ड्रिंक्सच्या प्रभावामुळे पारंपरिक शीतपेयांचा विसर पडत चालला आहे. परंतु पारंपरिक पेयांमध्ये नैसर्गिक पोषणमूल्ये असल्याने ती अधिक चांगली आहेत. उन्हाळ्यात शरीराला योग्य पोषण मिळण्यासाठी गूळ-पाणी, आंब्याचे पन्हे, ताक, आंबील आणि बेलसरबत यांचा समावेश आहारात करणे अत्यावश्यक आहे.