बेळगाव लाईव्ह : बेळगावसह कर्नाटकभर भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, रेबीजच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षभरात ६६,४८९ श्वानदंश झाल्याची नोंद असून, यामध्ये सर्वाधिक ४,५५२ घटना विजापूर जिल्ह्यात घडल्या आहेत. बेळगावमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून, राज्यात हा आकडा आठवर पोहोचला आहे.
बेळगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, दोन दिवसांआड कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक जखमी होत आहेत. मागील दोन महिन्यांत रेबीजमुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून, राज्यभरात हा आकडा आठवर पोहोचला आहे. यातील चार मृत्यू बंगळुरूमध्ये, तर उर्वरित अन्य जिल्ह्यांमध्ये झाले आहेत.
कुत्र्यांच्या निर्बिजीकरण प्रक्रियेकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील वर्षभरात कर्नाटकमध्ये ६६,४८९ श्वानदंश झाले असून, यातील सर्वाधिक ४,५५२ घटना विजापूर जिल्ह्यात नोंदवण्यात आल्या आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत राज्यात ४२ जणांचा रेबीजमुळे मृत्यू झाला होता, तर तब्बल ३ लाख ६१ हजार ५२२ श्वानदंशाच्या घटना घडल्या होत्या.
शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे साम्राज्य वाढले असून, या ढिगाऱ्यांवर भटकी कुत्री ठाण मांडून आहेत. महापालिकेने भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी मोहीम उघडली होती. मात्र, ही मोहीम सध्या थंडावली आहे.
हॉटेलमधील टाकाऊ पदार्थ आणि शिळे अन्न खाऊन ही कुत्री शहरात मुक्त संचार करत आहेत. त्यामुळे महापालिकेने निर्बिजीकरण मोहिम पुन्हा सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.