बेळगाव लाईव्ह : राज्यात आगामी जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांसाठी तयारी सुरू असून लवकरच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत आज बेळगाव दौऱ्यावर आलेले राज्य निवडणूक आयुक्त जी.एस. संग्रेशी यांनी सूतोवाच केले आहे.
ईव्हीएम हॅकिंगच्या सततच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची जागा मतपत्रिका घेणार असून मतपत्रिका अर्थात बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याचा विचार सुरू असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
बुधवारी बेळगावमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जी.एस. संग्रेशी म्हणाले, जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीबाबत उच्च न्यायालयात प्रविष्ट असलेला वाद निकाली लागला असून लवकरात लवकर निवडणुका घेण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोग तयारी करत आहे.
३१ मे पूर्वी जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका पार पाडण्यासाठी सरकार उच्च न्यायालयात आरक्षण सादर करणार आहे. त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली जाईल. यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डिसेंबर अखेरीस ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार असल्याने त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीसाठी बॅलेट पेपरचा विचार सुरू असून, त्यावर अंतिम निर्णय सरकार पातळीवर होणाऱ्या चर्चेनंतर घेतला जाईल, असे जी.एस. संग्रेशी यांनी स्पष्ट केले.