बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी उपनगरानजीकचा मंडोळी रोड, भवानीनगर हा रस्ता गेल्या काही वर्षांपासून कचऱ्याचे माहेरघर बनला आहे.
मात्र याकडे स्थानिक नगरसेवकाचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत असून मनपा आरोग्य खात्याने या कचऱ्याची त्वरित उचल करण्याची नागरिकांची विशेष करून सकाळी फिरावयास जाणाऱ्या मॉर्निंग वॉकर्सची मागणी आहे
मंडोळी रोड भवानीनगर या रस्त्यावर सुमारे गेल्या 5 वर्षांपासून मंडोळी रोड, भवानीनगर या रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पहावयास मिळते. खुल्या मोकळ्या भागात असल्यामुळे या रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. त्यामुळे याचा गैरफायदा घेत सदर रस्त्याच्या ठराविक एकांत असलेल्या भागात परिसरातील नागरिक आणि ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो.
त्यामुळे सदर ठिकाणी कचरा व शिळे अन्नपदार्थ भरलेल्या प्लास्टिक पिशव्या, इतर केरकचऱ्याचे कायम साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे रस्त्याचे सौंदर्य बिघडण्याबरोबरच या ठराविक भागात दुर्गंधीचे वातावरण असते. त्यामुळे यालाच ‘आमचे बेळगाव, स्वच्छ बेळगाव, सुंदर बेळगाव म्हणायचे का? अशी उपरोधी विचारणा या मार्गाचा वापर करणाऱ्या जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.
खुल्या वातावरणातील मोकळा रस्ता असल्यामुळे टिळकवाडी परिसरातील नागरिक या मार्गाचा सकाळी आणि सायंकाळी फिरण्याचा व्यायाम करण्यासाठी वापर करतात. या मंडळींना दररोज रस्त्या शेजारी मोठ्या प्रमाणात टाकलेल्या कचऱ्याचा त्रास सहन करावा लागतो. मिळालेल्या माहितीनुसार कचरा फेकला जाणाऱ्या ठिकाणापासून काही अंतरावरच या प्रभागाच्या नगरसेवकाचे घर आहे. मात्र ते देखील या कचऱ्याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात असते.
या पद्धतीच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळेच बेळगाव दक्षिण मतदार संघाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे, असा आरोपही केला जात आहे. त्याचप्रमाणे शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याएवजी या पद्धतीने साचून पडलेल्या कचऱ्याकडे दुर्लक्ष करणे हेच जनतेकडून सर्व प्रकारचे कर वसूल करणाऱ्या आणि स्मार्ट सिटी बेळगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बेळगाव महापालिकेचे कर्तव्य आहे का? असा संतप्त सवालही केला जात आहे.
तरी स्थानिक आमदारांसह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंडोळी रोड, भवानीनगर रस्त्यावरील कचऱ्याची गांभीर्याने दखल घेऊन तो युद्ध पातळीवर हटविण्याचे आणि पुन्हा त्या ठिकाणी कचरा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.