बेळगाव लाईव्ह :बेळगाव मधील संरक्षण खात्याच्या हद्दीतील विशेषतः सैनिक नगरजवळील रस्ते (डिफेन्स रोड) सार्वजनिक प्रवेशासाठी खुले करण्याबाबतचा प्रश्न बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी लोकसभेत उपस्थित केला.
खासदार शेट्टर यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेल्या शहरातील प्रमुख रस्त्यांची स्थिती स्पष्ट केली. केंद्रीय मंत्र्यांच्या मते संरक्षण आस्थापनांना आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत लष्करी अधिकाऱ्यांनी बेळगावातील पुढील रस्ते बंद केले आहेत.
सैनिकनगर रोड – हा रस्ता लष्करी क्षेत्रातून जातो. सैनिकनगर रहिवाशांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असला तरी सध्या हा मुद्दा कर्नाटक उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. चौगलेवाडी, पापामळा रोड – हा रस्ता भारतीय लष्कराच्या अधिसूचित फायरिंग रेंजमधून जातो. नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी गोळीबार सराव दरम्यान अपघात टाळण्यासाठी त्याला कुंपण घालण्यात आले आहे. मात्र सार्वजनिक वापरासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.
बसव कॉलनी रोड – लष्कराने अधिकृतपणे असा कोणताही रस्ता अस्तित्वात नसल्याचे म्हटले आहे. पूर्वी नागरिक ए-1 संरक्षण जमिनीवरील मार्गावरून जात असत, परंतु नंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यावर बंदी घालण्यात आली. येथेही सार्वजनिक सोयीसाठी पर्यायी मार्ग आधीच अस्तित्वात आहे.
या भागातील रहिवाशांसाठी संरक्षण रस्ते बंद करण्याचा मुद्दा दीर्घकाळापासून समस्येचा विषय आहे. संरक्षण मंत्रालयाने सुरक्षेच्या कारणास्तव या निर्बंधांची आवश्यकता असल्याचे म्हंटले असले तरी स्थानिक लोक सुलभ वहिवाटीसाठी या मार्गांचा वापर करत आहेत.