बेळगाव लाईव्ह :टिळकवाडीतील दुसऱ्या रेल्वे गेटवरील रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) आणि अनगोळ चौथ्या रेल्वे येथील भुयारी मार्गाचे (अंडरपास) काम लवकरच सुरू होणार असून या दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण 53.51 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती एसडब्ल्यूआर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मिळाली आहे.
दुसऱ्या गेटवरील आरओबी पूर्ण करण्यास 1.5 वर्षांचा, तर चौथ्या गेटवरील अंडरपाससाठी एका वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. बांधकाम कालावधी दरम्यान या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
दुसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी माती परीक्षण हे सुरू झाले आहे. दुसरा गेट रेल्वे ओव्हरब्रिज 32.43 कोटी रुपये खर्चून बांधला जाणार असून त्याचे कंत्राट हुबळी येथील स्वर्ण टेक्नो कन्स्ट्रक्शनला देण्यात आले आहे.
या आरओबी हा उड्डाणपुल 405 मीटर लांब आणि 7.3 मीटर रुंद (दुपदरी रस्ता) असेल. चौथ्या रेल्वे येथील भुयारी मार्गासाठी 21.08 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सदर प्रकल्पाचे कंत्राट एस. व्ही. कन्स्ट्रक्शन मंगळूर या कंपनीला देण्यात आले आहे. हा भुयारी मार्ग 265 मीटर लांब आणि 11.55 मीटर रुंदीचा असणार आहे.
सदर प्रकल्प एका वर्षात तो पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. दोन्ही प्रकल्पांच्या ठिकाणची वाहतूक वळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे विनंती सादर करण्यात आली असून नवीन वाहतूक योजना आल्यानंतर बांधकाम काम सुरू होईल.
दुसऱ्या रेल्वे गेट येथे माती परीक्षण सुरू झाले असून बेळगाव महानगरपालिकेने पूर्ण बांधकाम सुरू होण्यापूर्वी उपयुक्तता स्थलांतराच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी निविदा जारी केल्या आहेत.
या तयारीच्या कामाला 3 महिने लागतील अशी अपेक्षा आहे. अलिकडेच खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगावमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी उपरोक्त पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.