बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत वाहतूक नियमन, अपघात नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजनांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
जिल्ह्यातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि प्रवाशांना दिलासा देण्यासाठी ऑटोरिक्षांसाठी निश्चित दर लागू करणे आवश्यक आहे. त्यामुळे, ऑटोरिक्षांचे भाडेदर – किमान शुल्क, प्रती किलोमीटर दर आणि रात्रीच्या वेळेचा दर निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
शहरातील शाहापूर, उद्यमबाग आणि टिळकवाडी या भागांतील प्रमुख रस्त्यांवर सात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे, हे कॅमेरे त्वरित सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच, शहराच्या विविध भागांत आवश्यकतेनुसार नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चन्नम्मा सर्कल, जिल्हा ग्रंथालय आणि जिल्हा पंचायत कार्यालय परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे, वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी त्या परिसरात एकमार्गी वाहतूक लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अपघातप्रवण ठिकाणी वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी स्पष्ट सूचना फलक बसविण्यात यावेत. तसेच, ब्लॅक स्पॉट ओळखून त्या ठिकाणी आवश्यक सुधारणा केल्या जाव्यात, असे आदेश देण्यात आले. वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी यासाठी ठिकठिकाणी इशारा फलक लावण्याचे निर्देशही देण्यात आले.
शहरातील वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांनी केले.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रुती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. सोबरद, परिवहन विभागाचे अधिकारी आणि इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.