बेळगाव लाईव्ह :गोवावेस येथील श्री बसवेश्वर सर्कल अर्थात गोवावेस सर्कल येथे कांही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या खोदकामामुळे उखडलेला रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असून त्याची तात्काळ डागडूजी करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
गोवावेस सर्कल येथे कांही दिवसांपूर्वी ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्तीसंदर्भात खोदकाम करण्यात आले होते. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर डांबरीकरण करून अथवा पेव्हर्स घालून रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नाही.
परिणामी भर चौकातील एका बाजूचा उखडलेल्या स्वरूपातील हा रस्ता वाहनचालकांसाठी विशेष करून दुचाकी व तीन चाकी वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. सततच्या रहदारीमुळे सिग्नलच्या ठिकाणी उखडलेला रस्ता खचून निर्माण झालेली मोठी चर अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे.
सिग्नल पडताच या चौकातून अनगोळ, टिळकवाडीकडून शहापूरकडे जाणाऱ्या किंवा शहापूरकडून शहराच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना सदर चरीचा त्रास होत आहे.
तरी रहदारी पोलिसांसह संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चौकातील या रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.