बेळगाव लाईव्ह :रमजानचा एक महिना रोजा ठेवल्यानंतर आज सोमवारी राज्यभरात ईद साजरी केली जात असून बेळगाव मधील मुस्लिम बांधवांकडून देखील रमजान ईदचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने आज सकाळी सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रमही पार पडला.
रमजान ईद निमित्त आज पहाटेपासूनच शहर उपनगरातील मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचे नमाज पठण करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम भक्तीभावाने पार पडल.
या नमाज पठणातील शेकडो मुस्लिम बांधवांचा सहभाग लक्ष वेधणारा होता. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने वक्फ (दुरुस्ती) विधेयकाच्या निषेधार्थ आज लोकांना काळ्या पट्ट्या बांधण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार अनेक मुस्लिम बांधवांनी आज हाताच्या दंडावर काळ्या पट्ट्या बांधून नमाज पठण केले.
ईदगाह मैदानावरील सामूहिक नमाज पठणानंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ व माजी आमदार फिरोज सेठ यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी आवर्जून उपस्थित होते. आजी व माजी आमदार सेठ बंधूंनी यावेळी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांसह समस्त शहरवासीयांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.