बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये सोमवारी सायंकाळी वळिवाने हजेरी लावताच शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या भोंगळ कामांची पुन्हा लक्तरे वेशीवर आली. गटारींची दुरवस्था, सांडपाण्याचा निचरा न होणे आणि अव्यवस्थित नियोजनामुळे शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
सोमवारी सायंकाळी ४ च्या सुमारास बेळगावमध्ये वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या काही मिनिटांच्या पावसात शहरातील रस्ते पूर्णपणे जलमय झाले.
विशेषतः रुपाली टॉकीज, फोर्ट रोड, माणिकबाग, फुलबाग गल्ली, ताशिलदार गल्ली, पाटील मळा, पाटील गल्ली, तानाजी गल्ली आदी ठिकाणी गटारींचे पाणी रस्त्यावर वाहू लागले. या सांडपाण्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली, तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, त्या अंतर्गत झालेली कामे अशास्त्रीय पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. शहरातील गटारींची सफाई व्यवस्थित न केल्याने प्रत्येक वर्षी पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावरून वाहते आणि घराघरात, दुकानांत घुसते. या समस्येवर उपाय करण्याऐवजी प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र आहे.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून अधिकारी मात्र ‘स्मार्ट’ झाले, मात्र सामान्य नागरिक मात्र समस्या सहन करत आहेत. दरवर्षी हेच चित्र पाहायला मिळते, पण प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. या कामांची चौकशी होऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
शहराच्या व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. वाहनचालकांना रस्त्यावरून जाताना मोठ्या अडचणी आल्या. घराघरात आणि दुकानदारांच्या आस्थापनांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शहरातील गटारींची योग्य सफाई आणि ड्रेनेज सिस्टममध्ये सुधारणा करण्याशिवाय पर्याय नाही. प्रशासनाने तातडीने सुधारणा केली नाही, तर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. शहरातील पहिल्याच पावसाची झालेली हि अवस्था पाहून ‘पाणीच पाणी चहूकडे, गेला विकास कुणीकडे?’ असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.