बेळगाव लाईव्ह :शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या बारावीच्या परीक्षेला बेळगावसह राज्यात आज शनिवारपासून कडक बंदोबस्तात सुरुवात झाली आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये शहरातील 20 केंद्रांसह एकूण 41 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील एकूण 23,457 विद्यार्थी यंदाची ही पदवी पूर्व द्वितीय वर्ष अर्थात बारावीची परीक्षा देत असून आजपासून 20 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे.
परीक्षेसाठी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर आज शनिवारी सकाळी विद्यार्थी -विद्यार्थिनींची गर्दी पहावयास मिळत होती. यावेळी पालक व इतर लोकांना परीक्षा केंद्राबाहेर अडवून फक्त विद्यार्थ्यांना केंद्रांमध्ये सोडले जात होते.
परीक्षेच्या अर्धा तास आधी केंद्रात हजर राहण्याची सक्त सूचना करण्यात आल्यामुळे लवकर हजर झालेल्या विद्यार्थी -विद्यार्थिनींची आपला वर्ग आणि आसन क्रमांक शोधण्यासाठी लगबग सुरू होती. परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ न होता ती सुरळीत पार पडावी यासाठी परीक्षा काळात केंद्र परिसरात 144 कलमान्वये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
याखेरीज परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरासह भरारी पथकांकडून विशेष नजर ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त परीक्षेचे ‘वेबकास्टिंग’ देखील केले जात आहे.