बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आता मालमत्तांसाठीचे नमुना-9, 11A आणि 11B केवळ ई-स्वत्तू सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच वितरित करावे लागणार आहेत. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी यासंदर्भात कठोर आदेश काढले आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना ई-स्वत्तू प्रणालीद्वारेच मालमत्तांच्या नोंदीसाठीचे नमुना-9, 11A आणि 11B वितरित करावे, असा स्पष्ट आदेश जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिला आहे.
यापुढे कोणत्याही परिस्थितीत हाताने लिहिलेल्या किंवा जुन्या पद्धतीने दिल्या जाणाऱ्या उताऱ्यांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात सरकारने पूर्वीच निर्देश दिले असून, त्यानुसार सर्व ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
राहुल शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, आदेशाचे उल्लंघन करून जर कोणत्याही ग्रामपंचायतीत हाताने लिहिलेले उतारे वितरित केले जात असतील, तर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत विकास अधिकारी, सचिव आणि द्वितीय श्रेणी लेखा सहाय्यक यांना या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे.