बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या नेहरूनगर परिसरातील एका पीजीमध्ये दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या ऐश्वर्या लक्ष्मी प्रकरणात पोलीस तपासाला गती आली असून एपीएमसी पोलिसांनी तपास वेगवान करत संशयित आरोपीला अटक केली आहे. शनिवारी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मूळची विजापूरची रहिवासी असलेल्या ऐश्वर्या लक्ष्मी शिक्षणासाठी बेळगावमध्ये वास्तव्यास होती.
दोन दिवसांपूर्वी तिच्या आत्महत्येची घटना उघडकीस आली होती. सदर विद्यार्थिनीचे आत्महत्येपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता विद्यार्थिनीला भेटण्यासाठी आलेला तरुण फरार झाल्याचे समोर आले होते.
या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत फरार तरुणाचा शोध घेतला. तपासादरम्यान, ऐश्वर्या लक्ष्मीने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या प्रियकराला शेवटचा संदेश पाठविल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर आरोपी कोल्हापूरला फरार झाला होता. त्याचा तपास घेत पोलिसांच्या विशेष पथकाने शोधमोहीम राबवून शनिवारी सदर तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी आज दिली.