बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती (सीमाभाग) यांच्या वतीने चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेण्यात आली. सीमाभागातील मराठी भाषेसाठी लढणाऱ्या युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून दडपशाही केली जात असून यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने हस्तक्षेप करून आवाज उठवावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना प्रशासनाने हद्दपारीची नोटीस बजावली असून, या विरोधात महाराष्ट्र सरकारने आवाज उठवावा, अशी मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
बैठकीत बाळेकुंद्री येथील बस वाहकाने लावलेले खोटे आरोप, किणये येथे मराठी भाषेच्या विरोधात पीडीओ अधिकाऱ्यांनी दाखवलेली अरेरावी आणि त्यानंतर मराठी भाषेसाठी लढणाऱ्या युवकांचा सत्कार केल्याने शुभम शेळके यांना हद्दपारची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. शेळके यांनी गेल्या महिन्याभरात त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची माहिती आणि वृत्तपत्रातील बातम्या आमदारांना दाखवल्या.
या सर्व गोष्टींचा विचार करून आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सीमाभागातील मराठी भाषेसाठी लढणाऱ्या युवकांवर होणाऱ्या अन्यायकारक कारवाईबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष प्रविण रेडेकर, उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर, विजय जाधव, चंद्रकांत पाटील, रामनाथ मुंचडीकर, सुयोग कडेमनी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.