बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक नुकतीच पार पडल्यानंतर आता बेळगाव महानगरपालिकेच्या पुढील 2026 सालच्या 24 व्या कार्यकाळातील महापौर व उपमहापौर पदाचे आरक्षण नगर विकास खात्याने जाहीर केले असून ते बदलण्यात आले आहे. त्यानुसार महापौर पद सामान्य महिलेसाठी तर उपमहापौर पद सामान्य प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे.
आधीच्या आदेशानुसार 24 व्या कार्यकाळाचे महापौर पदाचे आरक्षण सामान्य प्रवर्गासाठी होते, तर उपमहापौर पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव होते. तथापि आता त्यात अनुक्रमे सामान्य महिला व सामान्य प्रवर्ग असा बदल करण्यात आला आहे.
म्हैसूर व तुमकुर या दोन महापालिका सोडून राज्यातील सर्वच महापालिकांचे 24 व्या कार्यकाळाचे आरक्षण बदलण्यात आले आहे. बेळगावच्या महापौर व उपमहापौर पदाची 24 व्या कार्यकाळाची निवडणूक मार्च 2026 मध्ये होणार आहे.
दरम्यान 25 व्या कार्यकाळासाठी म्हणजे मार्च 2027 मध्ये होणाऱ्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठीचे आरक्षण देखील आधीच जाहीर झाले आहे. त्या आरक्षणात मात्र कोणताही बदल न करता महापौर पद आधी प्रमाणे सामान्य प्रवर्गासाठी तर उपमहापौर पद सामान्य महिलेसाठी आरक्षित असणार आहे.