बेळगाव लाईव्ह : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. बांबूच्या काठ्या, साखरमाळा, गुढीसाठी लागणारे वस्त्र यासह विविध साहित्य बाजारात दाखल झाले असून बुरुड गल्ली, मारुती गल्ली आणि गणपत गल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे.
गेल्या काही वर्षांपासून आकर्षण असलेल्या नॅनो गुढ्या तसेच गुढीसाठी लागणारे रेडिमेड वस्त्र यंदाही ग्राहकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहेत. यामध्ये खण, शाही मस्तानी, नऊवारी, पैठणी अशा विविध रंगातील आकर्षक तयार वस्त्र आहेत. या वस्त्रांच्या किंमती १५० ते ५०० रूपयांपर्यंत आहेत. यामध्ये यंदा नऊवारी कापडापासून तयार केलेल्या वस्त्रांना सर्वाधिक पसंती असल्याचे पहायला मिळत आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो आणि याच मुहूर्तावर नववर्षाचे स्वागत केले जाते. गुढीपाडवा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. घराघरांत गुढी उभारली जाणार असल्याने बाजारात गुढीसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहे. गुढीसाठी लागणारा बांबू 100 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत उपलब्ध असून विविध रंगांच्या साखरमाळाही विक्रीसाठी आल्या आहेत.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तूची खरेदी करणे शुभ मानले जाते. ग्राहकांची ही नस ओळखून व्यापाऱ्यांनीही कंबर कसली आहे. ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे व्यापारीवर्गात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. सोन्याचा दर वाढला असला तरी गुंतवणुकीसाठी ग्राहक मागे हटलेले नाहीत. शुभमुहूर्त असल्याने सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन आणि घर खरेदीसाठीही नागरिक मोठ्या संख्येने पुढे येत आहेत.
वाहन खरेदीतही मोठी वाढ झाली असून मोठ्या प्रमाणात वाहनासाठी ऍडव्हान्स बुकिंग करण्यात आले आहे. दुचाकी, चारचाकी आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसून येत असून काही शोरुम्समध्ये वाहने तातडीने उपलब्ध नसल्याने ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील विविध दुकानांनी आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. गुढीपाडव्याचा उत्साह आणि खरेदीचा जोर यामुळे बेळगावमधील बाजारपेठा सध्या फुलून गेल्या आहेत.