बेळगाव लाईव्ह :जुने बेळगाव येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा क्र. 33 या शाळेतील एका वादग्रस्त शिक्षिकेची तात्काळ अन्यत्र बदली केली जावी, अशी वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आक्रमक झालेल्या संतप्त गावकरी व शाळा सुधारणा समितीने शाळेला टाळे ठोकल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली.
सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा क्र. 33, जुने बेळगाव या शाळेत गेल्या सात-आठ वर्षापासून कोष्टी नामक शिक्षिका काम करत आहे. या शिक्षिके विरुद्ध विद्यार्थी व पालकांच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यामुळे तिची तडकाफडकी अन्यत्र बदली करण्यात यावी अशी लेखी मागणी शाळा सुधारणा समितीने बऱ्याचदा गटशिक्षणाधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे केली होती.
वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांसह गावकरी आणि शाळा सुधारणा समितीच्या पदाधिकारी सदस्यांनी आज मंगळवारी सकाळी शाळेला टाळे ठोकून वरिष्ठांचे लक्षवेधण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेबाहेर बसवले. तसेच जोपर्यंत कोष्टी या शिक्षिकेची बदली होत नाही तोपर्यंत शाळा उघडली जाणार नाही असा पवित्रा घेतला.
या आंदोलनाची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील बीआरसी व सीआरसी अधिकाऱ्यांनी शाळेकडे धाव घेतली. तसेच शाळा सुधारणा समिती व गावकऱ्यांबरोबर बैठक करून संबंधित शिक्षिकेवर आज सायंकाळपर्यंत बदलीची कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिले. सदर आश्वासनानंतर टाळे उघडून शाळा पूर्ववत सुरू करण्यात आली. याप्रसंगी जुने बेळगाववासिया बहुसंख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे क्रियाशील सदस्य संतोष शिवनगेकर यांनी सांगितले की, संबंधित कुष्टे या शिक्षकेविरुद्ध शाळा सुधारणा समितीने गटशिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात वारंवार तक्रार नोंदवली आहे. तथापि सदर तक्रारीकडे दुर्लक्ष करून गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी त्या शिक्षिकेला पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. सदर शिक्षिकेची तात्काळ उचल बांगडी केली जावी यासाठी संतप्त पालक, गावकरी व एसडीएमसीने आक्रमक पवित्रा घेत आज शाळेला टाळे ठोकून विद्यार्थ्यांना बाहेर बसवले होते.
तसेच त्या शिक्षिकेची बदली होत नाही तोपर्यंत शाळेला टाळे राहील असा इशारा दिला होता. त्याची दखल घेत गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शाळेत येऊन शाळा सुधारणा समिती व गावकऱ्यांबरोबर चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी त्या शिक्षिकेसंदर्भात आज सायंकाळपर्यंत बदलीची कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. जर या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून दाद मागितली जाईल, असा इशारा आम्ही अधिकारीवर्गाला दिला आहे, अशी माहिती संतोष शिवानगेकर यांनी दिली.
बीआरसी अधिकारी हिरेमठ यांनी यावेळी बोलताना म्हणाले की, शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांची नुकतीच आमची बैठक झाली आहे. त्या बैठकीत शाळेतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली त्या अनुषंगाने शाळेमध्ये पुढील वर्षापासून पूर्व प्राथमिक एलकेजी युकेजी विभाग सुरू करण्यास आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.
त्यासाठी रीतसर अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शाळेतील कोष्टी नामक वादग्रस्त विरुद्धच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन त्यांची अन्यत्र बदली करण्यासंदर्भात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल, असे हिरेमठ यांनी स्पष्ट केले.