Saturday, March 15, 2025

/

महापौर पदी निवड होताच काय म्हणाले मंगेश पवार

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या 23 व्या कार्यकाळातील नूतन महापौरपदी प्रभाग 41 वडगाव चे नगरसेवक मंगेश पवार यांची, तर उपमहापौरपदी  प्रभाग 44 अनगोळच्या नगरसेविका वाणी जोशी यांची निर्विवाद निवड झाली आहे. या उभयतांनी आज झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत  विजय संपादन केला.

साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज अखेर सुरळीत पार पडली. सदर निवडणूक प्रक्रियेला आज सकाळी नाडगीताने प्रारंभ झाला. त्यानंतर सभागृहातील उपस्थित सदस्यांच्या हजेरी वेळी 65 पैकी 60 सदस्य उपस्थित होते. याची नोंद घेऊन गणपुर्ती पडताळणी पार पडली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवेळी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंतच्या कालावधी इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. यावेळेचे महापौर पद सामान्य प्रवर्गासाठी आणि उपमहापौर पद सामान्य महिला असे आरक्षित होते. त्यामुळे महापौर पदासाठी सत्ताधारी गटातून नगरसेवक मंगेश पवार, राजू भातकांडे, नितीन जाधव विरोधी पक्षातून बसवराज मोदगेकर  तर उपमहापौर पदासाठी  सत्ताधारी गटातून वाणी जोशी, दिपाली टोपगी,  वीणा विजापुरे, रेखा हुगार व सविता पाटील विरोधी गटातून लक्ष्मी लोकरे इच्छुक होत्या.

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची पडताळणी करून त्यांची घोषणा करण्यात आली. तसेच अर्ज मागे घेण्याचा कालावधी समाप्त होताच इतरांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक रिंगणातील महापौर पदाच्या निवडणुकीसाठी मंगेश पवार व मोदगेकर यांच्या नावाची, त्याचप्रमाणे उपमहापौर पदासाठी वाणी जोशी व लक्ष्मी लोकरे उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. निवडणूक अधिकारी प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टन्नावर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरु झाली. यावेळी दोन्ही पदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्यामुळे हात उंचावून मतदान घेण्यात आले.

त्यामध्ये महापौर पदाच्या मतदानामध्ये मंगेश पवार यांना 40 मते आणि प्रतिस्पर्धी मोदगेकर यांना 20 मते पडली. त्याचप्रमाणे उपमहापौर पदाच्या मतदानात वाणी जोशी यांना 40 मते, तर लक्ष्मी लोकरे यांना 20 मते मिळाली. त्यामुळे निवडणूक अधिकारी संजीव शेट्टन्नावर यांनी महापौरपदी मंगेश पवार आणि उपमहापौरपदी वाणी जोशी यांची निवड झाल्याचे जाहीर केले. बेळगाव महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे दक्षिण मतदार संघालाच मिळाली आहेत यंदा उत्तर मतदार संघाला एकही पद मिळाले नाही याची चर्चा मनपा सभागृहात यावेळी ऐकावयास मिळाली.

महापौर निवडणुकीनंतर माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना नूतन महापौर मंगेश पवार यांनी सांगितले की, मी वयाच्या 18 व्या वर्षापासून आज पर्यंत समाजसेवा करत आलो आहे. त्यामुळे आता शहराचा महापौर झाल्यानंतर जनहिताला माझे प्रथम प्राधान्य असेल. ज्यातून बेळगावचा विकासही होईल. मात्र हा विकास सत्ताधारी आणि विरोधी असा भेदभाव न करता सर्व 58 नगरसेवकांनी सहकार्य केले तरच साध्य होणार आहे. त्याचप्रमाणे काही समस्या असतील तर एकमेकांच्या सल्ल्याने सामंजस्याने दूर केल्या पाहिजेत असे मला वाटते.

आजच्या निवडणुकीत विरोधी गटातील सदस्यांनी देखील आम्हाला मतदान केले आहे आणि त्यामुळेच मंगेश पवार आज तुमच्यासमोर महापौर म्हणून उभा आहे असे सांगून या पद्धतीने आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल महापौर पवार यांनी विरोधी गटातील नगरसेवकांचे आभार मानले.Mayor

पाणीपुरवठ्याच्या बाबतीतील प्रश्नाला उत्तर देताना महापौर मंगेश पवार म्हणाले की, बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी एल अँड टी कंपनीवर सोपविण्यात आली आहे हे सर्वश्रुत आहे. मात्र गेल्या पाच -सहा वर्षापासून लोकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. माझ्या मते 24 तास पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन घालण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच या समस्येचे निवारण होणार आहे.

जुन्या पाईपलाईनच्या शेजारी 24 तास पाणी पुरवठ्याच्या पाईप घातल्या जात आहेत, त्या घालताना अनावधानाने शेजारील जुनी पाईप फूटत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. ही वस्तुस्थिती आणि सध्याचा वाढता उष्मा लक्षात घेता शहरवासीयांनी पाण्याचा जपून वापर केला पाहिजे. सध्याच्या घडीला विहिरींचे पाणी 30 -40 फूट खाली उतरले आहे. त्यामुळे लोकांनी पाण्याची नासाडी न करता ते जपून वापरले तर भविष्यात गंभीर समस्या निर्माण होणार नाही. जलाशयात पुरेसे पाणी असल्यामुळे सध्या तरी पाण्याची तशी अडचण नाही, असे नूतन महापौरांनी शेवटी स्पष्ट केले.

निवडणुकीनंतर सभागृहात बोलताना माजी मुख्यमंत्री आणि बेळगावचे विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांनी वैयक्तिक आणि बेळगाव लोकसभा मतदार संघातील जनतेच्यावतीने महापौर व उपमहापौर पदी निवड झाल्याबद्दल अनुक्रमे मंगेश पवार आणि वाणी जोशी यांचे अभिनंदन केले. या उभयतांच्या कार्यकाळात बेळगाव महापालिकेसह शहराची आणखी भरभराट होईल अशी अपेक्षा आहे असे सांगून निवडणुकी वेळी सत्ताधारी आणि विरोधी गटात स्पर्धा असली पाहिजे मात्र त्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे बेळगावच्या विकासासाठी कार्यरत राहिले पाहिजे. राज्य आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना मंजूर होतात त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली पाहिजे. सर्वांनी संघटितपणे कार्य केल्यास बेळगाव शहर एक आदर्श शहर म्हणून उदयाला येण्यास वेळ लागणार नाही, असे खासदार शेट्टर यांनी सांगितले.

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.