बेळगाव लाईव्ह :संत साहित्याने या विश्वाला या माणसांना बहुजन समाजाला प्रकाशाची वाट दाखवली आहे. तेंव्हा त्याच वाटेवरून साहित्यिकांनी आपण निर्माण करत असलेल्या साहित्याने समाजाला प्रकाशाची वाट दाखवली पाहिजे, असे विचार सांगली जिल्ह्यातील चिंतनशील साहित्यकार दि. बा. पाटील (कामेरी) यांनी व्यक्त केले.
कुद्रेमनी (ता. जि. बेळगाव) येथील श्री बलभीम साहित्य संघातर्फे आज रविवारी कै. परशराम मि. गुरव संमेलन नगरी येथे आयोजित 19 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक पाटील म्हणाले की, आपल्या देशात 1980 नंतर जागतिकीकरणाची लाट आली आणि साहित्य बदलण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आज नव्या जाणीवांनी नवे लेखक लिहित आहेत. खरंतर वेदनाही साहित्याच्या मुळाशी आणि दाराशी असते. महाराष्ट्राला आणि देशाला संत साहित्याने प्रकाशाची वाट दाखवली, लोकांना शहाणे करण्याचा प्रयत्न केला.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या काळजाला विश्वाचे दुःख बोचले आणि त्या वेदनेतूनच त्यांनी या विश्वाला प्रकाशाची वाट दाखवण्यासाठी ‘ज्ञानेश्वरी’ सारखा ग्रंथ लिहिला. जे साहित्य उभे राहतं त्याच्या तळाशी दुःख वेदना असते. थोडक्यात दुःख वेदनांमधूनच साहित्याची निर्मिती होत असते. माझी माणसं, माझा समाज जो अंधश्रद्धेने बरबटला आहे. या अज्ञानी समाजाला प्रकाशाची वाट दाखवावी या समाजाला ज्ञान द्या व अंधश्रद्धेतून बाहेर काढावं यासाठी संत तुकारामांनी ‘तुकाराम गाथा’ लिहिली. ही गाथा संपूर्णपणे माणसाला काहीतरी शहाणपणा देणारी आहे. म्हणजे संत साहित्याने जर या विश्वाला या माणसांना बहुजन समाजाला प्रकाशाची वाट दाखवली असेल तर त्याच वाटेवरून साहित्यिकांनी आपण निर्माण करत असलेल्या साहित्याने समाजाला प्रकाशाची वाट दाखवली पाहिजे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश दिला. त्यानंतर डॉ आंबेडकरांच्या विचाराने झपाटलेली एक पिढी शिक्षण घेऊन शहाणी झाली, संघटित झाली. या पिढीने आपल्या बापजाद्यांनी सहन केलेले दुःख वेदना समाजासमोर आणल्या आपल्या समाजाला त्या दुःख वेदनेतून बाहेर काढले.
आज शिक्षणाचा प्रसार झपाट्याने झालेला आहे. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता अस्तित्वात आली आहे. मात्र माणसाचे जे मन आहे, त्याच्या मनाच्या ज्या भावना आहेत त्या भावना एआयमध्ये असणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे एआय निर्मिती मागची बुद्धिमत्ता ही माणसाचीच आहे, असे साहित्यिक दि. बा. पाटील (कामेरी) यांनी सांगितले.
कुद्रेमनी येथील साहित्य संमेलनाची सुरुवात आज सकाळी 9 वाजता गावातील श्री विठ्ठल -रखुमाई मंदिरापासून संमेलन स्थळापर्यंत काढण्यात आलेल्या सवाद्य ग्रंथदिंडीने झाली. यावेळी विष्णू जांबोटकर, प्रकाश गुरव, अर्जुन राजगोळकर, प्रशांत सुतार, निंगाप्पा पाटील, कृष्णा धामणेकर, शांताराम पाटील, श्रीकांत पेडणेकर, भैरू आनंदाचे व संतोष गुरव या मान्यवरांच्या हस्ते श्री व विठ्ठल रखुमाई मूर्ती पूजन, पालखी पूजन ग्रंथ पूजन, दिंडी उद्घाटन आणि मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन असे कार्यक्रम पार पडले. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून फिरवून ग्रंथदिंडी सोहळ्याची संमेलन नगरीत सांगता झाली.
दिंडीच्या सांगतेनंतर प्रथम कै. परशराम गुरव साहित्य नगरीचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय पाटील व एस. एम. इलेक्ट्रिकल्स शिनोळीचे मारुती पाटील यांच्या हस्ते झाले. कै. परशराम गुरव स्मारकाचे पूजन श्री भाग्यलक्ष्मी सोसायटीचे अध्यक्ष अर्जुन जांबोटकर व शिक्षणप्रेमी जक्काप्पा पाटील यांच्या हस्ते झाले.
त्यानंतर पीकेपीएस सोसायटीचे अध्यक्ष परशराम पाटील, रवळनाथ दूध संघाचे अध्यक्ष मारुती सुतार, माजी ग्रा.पं. अध्यक्ष संजय पाटील, कुद्रेमनी हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक एम. बी. शेडबाळे, मराठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक के. एल. गुंजीकर, वैभव इंडस्ट्रीज बेळगावचे सदानंद धामणेकर व उद्योजक राहुल कदम या मान्यवरांच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
काकती येथील मार्कंडेय साखर कारखान्याचे अध्यक्ष आर. आय. पाटील यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन पार पडले. काही ईश्वर गुरव व्यासपीठाचे उद्घाटन ॲड. सुधीर चव्हाण व ॲड. श्याम पाटील यांच्या हस्ते होऊन संमेलनाला सुरुवात झाली. दोन सत्रात होत असलेल्या या संमेलनाच्या सकाळच्या पहिल्या सत्रात स्वागत समारंभ आणि संमेलनाध्यक्षाचे अध्यक्षीय भाषण झाले. त्याचप्रमाणे दुसऱ्या सत्रात प्रा. चंद्रकांत पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले या कवी संमेलनात कवी बसवंत शहापूरकर, संजीव वाटुपकर, प्रा. अशोक अलगोंडी, सीमा कणबरकर आदी कवींचा सहभाग होता. संमेलनानिमित्त गावातील सेवानिवृत्त शिक्षक जवान तसेच इतर कर्तबगार लोकांचा सत्कार करण्यात आला. संमेलनाला कुद्रेमनी पंचक्रोशीसह बेळगाव वगैरे परगावचे मराठी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.