बेळगाव लाईव्ह : रिअल इस्टेट व्यावसायिक बसवराज अंबी यांच्या अपहरण प्रकरणात नवे ट्विस्ट समोर येताच मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निकटवर्तीय आणि गोकाक तालुका महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्षा मंंजूळा रामनगट्टी यांना गोकाक पोलिसांनी अटक केली.
मात्र आपल्या अपहरणाचा मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी कोणताही संबंध नाही, अपहरणकर्त्यांनी प्राणघातक धमक्या देत मोठी खंडणी मागितली होती, असे स्वतः अंबी यांनी सांगितले.
मूळचे बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील राजापूर गावातील असलेले बसवराज अंबी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, त्या दिवशी मी माझी कार दुरुस्तीसाठी सांगली येथे नेली होती. चिकोडीकडे परत येत असताना काही लोकांनी माझी कार अडवली आणि मला जबरदस्तीने पळवून नेले.
गोवा घाटात नेऊन कार दरीत फेकण्याची धमकी दिली. त्यानंतर माझ्या घरच्यांना फोन करून पाच कोटींची खंडणी मागण्यास भाग पाडले. अपहरणकर्त्यांनी सतत तीन ते चार वेळा वाहनं बदलत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवले. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांमध्ये फिरवत ठेवले. जर पोलिसांना काही सांगितले तर ठार मारू, अशी धमकी देण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.
अपहरणकर्त्यांच्या दबावामुळे त्यांनी पत्नीला पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले. मात्र, पोलिसांनी लोकेशनच्या आधारे तपास करून त्यांना योग्यवेळी शोधून काढले आणि त्यांचा जीव वाचवला, असे अंबी यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी गोकाक तालुका महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्षा मंंजूळा रामनगट्टी यांना घटप्रभा पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर सतीश जारकीहोळी त्यांचे नाव याप्रकरणी गोवण्यात आले होते त्यानंतर हे स्पष्टीकरण समोर आले आहे.